बेळगाव : गौंडवाड येथे देवस्थान जमिनीच्या वादातून सतीश राजेंद्र पाटील याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणानंतर गौंडवाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आरोपीला अटक करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. आरोपींनी पुन्हा धमकी दिली असून तातडीने त्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी समस्त गौंडवाड ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतीश याची आई, पत्नी आणि बहिणीने एकच आक्रोश केला. यामुळे साऱ्यांचेच मन हेलावून गेले होते. पोलिसांनी जर योग्य वेळी कारवाई केली असती तर ही घटना घडलीच नसती असा आरोप देखील यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
केवळ एकमेकांवर पोलिसांनी फिर्याद नोंदवण्याचे काम केले आहे. योग्यवेळी कारवाई केली असती तर हे प्रकरण शांततेत मिटले असते पण पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. त्याचबरोबर निष्पाप तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची सुटका करावी अशी मागणी करण्यात आली.
