बेळगाव : बेळगाव तालुक्यातील एका मुलीचा डेंग्यूमुळे आज शुक्रवारी दुपारी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूमुळे गावात डेंग्यू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.
बेळगाव तालुक्यातील मरगाई गल्ली, हलगा येथील 13 वर्षीय बालिका हर्षदा भीमराव संताजी असे डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. गेल्या कांही दिवसापासून हर्षदा आजारी होती. तिला उपचारासाठी नेहरुनगर येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचाराचा कांहीही उपयोग न झाल्याने सदर बालिकेचा आज दुपारी 12:30 च्या सुमारास मृत्यू झाला आहे. इयत्ता सातवीत शिकणारी हर्षदा यावर्षी आठविला जाणार होती. सदर मुलीच्या मृत्यूमुळे आता बेळगाव तालुक्यात कोरोना मागोमाग जीवघेण्या डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क होण्याबरोबरच आपल्या घरासह आपला परिसर स्वच्छ ठेवणे यावर भर देणे गरजेचे झाले आहे.
दरम्यान, हर्षदा संताजी तिच्या मृत्यूमुळे हलगा गावात डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. तेंव्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.