Share
बेळगाव : राजकीय हेतूने आणि द्वेषातून तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्या केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करत आज बेळगावात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
आज बेळगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्या भाजप सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी बेळगाव शहर, ग्रामीण आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री विनय कुलकर्णी, आमदार अंजली निंबाळकर, बेळगाव उत्तरचे माजी आमदार फिरोज सेठ आदी नेते सहभागी झाले होते. तत्पूर्वी काँग्रेस भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रचार राज्य समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील म्हणाले, भाजप देशात द्वेषाचे राजकारण करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस नेते आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील संविधान आणि लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या प्रकरणी एफआयआर नसतानाही भाजप सरकार द्वेषाचे राजकारण करत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये हिंमत निर्माण करण्यासाठी आम्ही लढत आहोत, असे ते म्हणाले.
माजी मंत्री विनय कुलकर्णी, आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार फिरोज सेठ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह बेळगाव शहर व ग्रामीण जिल्हा शाखांचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
Post Views:
362