बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी संपूर्ण देशात नवचैतन्य पसरले आहे. देशाच्या कानाकोपर्यात तिरंगा झेंडे फडकत आहेत. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्या लाखो स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्याचे एक महान कार्य सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बेळगाव महानगरपालिकेच्या सहकार्याने दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशाल तिरंगा रॅली काढण्यात आली. धर्मवीर संभाजी मैदान, महाद्वार रोड येथे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिकांनी हातात 75 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज घेऊन भारत माता की जयचा नारा दिला. याद्वारे त्यांनी सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार अभय पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 मीटर लांबीची तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. उद्यापासून बेळगाव शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवून बेळगावच्या जनतेची देशभक्ती संपूर्ण देशापर्यंत पोचविण्याचे काम करूया असे आवाहन त्यांनी केले.
महाद्वार रोडवरील संभाजी महाराज उद्यानातून निघालेली ही रॅली शामाप्रसाद मुखर्जी रोड, शहापूर मार्गे शिवाजी गार्डन येथे संपली. यावेळी मनपा आयुक्त डॉ .रुद्रेश घाळी, उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, नगरसेवक नितीन जाधव, गिरीश धोंगडी, सारिका पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुम्मगोळ आदींसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta