बेळगाव : अलारवाड ते मच्छे या दरम्यान संपूर्ण जमीन तिबार पिकांची आहे. यामुळे येथे बायपास रस्ता करू नका अशी मागणी शेतकऱ्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.
आपल्या भूमातेच्या संरक्षणासाठी याच भूमीत पिकवण्यात आलेले बासमती तांदूळ आणि मसूर मुख्यमंत्र्यांना भेटी दाखल देण्यात आले.
बायपास विरोधातील लढा अनेक काळ सुरू आहे. या लढ्यात न्यायालयीन मार्गाचीही निवड शेतकऱ्यांनी केली आहे. तरीही हा प्रकल्प रद्द न करता वारंवार तो पुढे सरकावण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात आली.
या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या आणि आमच्या जमिनी सुरक्षित ठेवा अशी मागणी करण्यात आली.बेळगावच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांकडे भेट मागितली होती त्यांना चर्चेसाठी भेट मिळत नव्हती. मात्र अखेर शासकीय विश्रामगृहात त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली त्यावेळी हलगा मच्छे बायपास सुपीक जमिनीत येणारी तिबारी पिके दाखवत जमीन संपादित करू नये अशी मागणी केली.