बेळगाव : येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेची 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर हे होते. तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण -पाटील यांच्यासह संचालक सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, सुवर्णा शहापूरकर, लक्ष्मी कानूरकर, सुहास तरळ, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे, मारुती सिगिहळली आणि सीईओ अनिता मूल्या उपस्थित होत्या.
सीईओनी उपस्थितांचे स्वागत करून सभेला सुरुवात केली. कालच आजाराने निधन पावलेले बँकेचे संचालक रमेश शिंदे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री उमेश कत्ती तसेच गेल्या वर्षभरात दिवंगत झालेल्या सभासदांना दोन मिनिटे उभारून श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या वर्षी 18 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वाचून दाखवल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर चेअरमन श्री. अष्टेकर यांनी वार्षिक अहवालाचा गोषवारा सादर केला. 31 मार्च अखेर एकूण उत्पन्न 10 कोटी 75 लाख झाले असून एकूण खर्च 9कोटी 54 लाख 14 हजार झाला आहे तो व आयकर वजा जाता बँकेला एक कोटी 21 लाख 57 हजार चा निवळ नफा झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. बँकेच्या इतिहासात प्रथमच बँकेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा पार करुण एक कोटीहून अधिक नफा मिळवण्याची व ऑडिट रेटिंग ए ग्रेड मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे याशिवाय निव्वळ अनु उत्पादित कर्जाचे प्रमाणही 0.35 टक्के असण्याची पहिलीच वेळ आहे” असे श्री प्रदिप अष्टेकर यांनी जाहीर केल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात घोषणा देत अष्टेकर यांचे अभिनंदन केले.
ही सभा बँकेच्या मठ गल्ली बेळगाव येथील मुख्य शाखेत आयोजित करण्यात आली होती. अ वर्ग सभासदांना 20% तर ब वर्ग सभासदांना 8% लाभांश देण्याची घोषणा करताच सभासदातून अभिनंदनाच वर्षाव झाला. कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना लागू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्याचबरोबर आधुनिक प्रणालीनुसार येत्या वर्षभरात ग्राहकांना त्यांच्या खात्यामधून थेट आरटीजीएस व एनईएफटी करण्याची सुविधा, खातेदारांना एटीएम डेबिट कार्ड देण्याची सुविधा, आणि इतर सुविधा देण्याबरोबरच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मायक्रो फायनान्स सुरू करण्यात येणार आहे त्याचा उपयोग महिला सबलीकरणासाठी निश्चित होईल “असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकेला मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
त्यानंतर सीईओ अनिता मूल्या यांनी इतर विषयांचे वाचन केले. त्याला सभागृहाने टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी दिली.
बँकेच्या प्रगतीबद्दल कौतुक करणारी माजी महापौर विजय मोरे, नारायण किटवाडकर, माजी संचालक विकास कलघटगी, महादेव पाटील, विठ्ठल पोळ, मारुती मनमाडकर आणि मारुती देवगेकर यांची भाषणे झाली.
खेळीमेळीत पार पडलेल्या सभेचा समारोप व्हाईस चेअरमन श्री. रणजीत चव्हाण- पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
Belgaum Varta Belgaum Varta