बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतकडून जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी व सर्व शाळांच्या शिक्षकानी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते.
निवेदनात म्हटले होते की येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा जवळील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व सिग्नल बोर्ड बसविणे आणि नंदीहळ्ळी, देसुर, आणि गर्लगुंजी येथून येणारी विटा, वाळूची वाहने फार वेगाने ये-जा करत असतात. यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत असून याची दखल घेऊन वेळेत हि कामे पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच त्यापूर्वीही 2 वेळा या संदर्भात मान्य. सहायक कार्यनिर्वाहिक कंत्राटदार यांना देखील निवेदन दिले होते. पण याबाबत आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. इतके वेळा निवेदन देऊन देखील याबाबत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे काल दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी येळ्ळूरवाडी कन्नड शाळेतील इयत्ता पहिली मधील विद्यार्थी कु. विरेश शिवशंकर सूर्यवंशी याला एका भरधावात असलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने तो जखमी झाला आहे. यापूर्वीही असे छोटे-मोठे अपघात झाले असून प्रशासन नेमके कधी जागे होणार असा प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सरकारी विभागाच्या या दुर्लक्षपणामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील तसेच गावकऱ्यांनी केली आहे.