आ. श्रीमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : 23 तलावांचा विकास होणार
कागवाड (प्रतिनिधी) : कागवाड मतदार संघात हरितक्रांती घडविण्यासाठी आ. श्रीमंत पाटील यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या प्रयत्नातून गुरूवारी या क्षेत्रातील 23 तलावांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी 230 कोटींचे अनुदान मंजूर केले. अनुदान मंजूर झाल्याचे कळताच मतदार संघातील विविध गावच्या भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष केला.
दुष्काळी म्हणून गणल्या जाणार्या अथणी व कागवाड तालुक्याला सध्या सर्वाधिक गरज आहे ती पाण्याची. कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यासाठीच सातत्याने पाठपुरावा करत असतात. याचाच भाग म्हणून त्यांनी 23 तलावांच्या विकासासाठी अनुदानाची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली होती. लहान गावांतील शेतकरी व जनतेचे पाण्यासाठी होणारे हाल मुख्यमंत्री व पालकमंत्री व पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी 230 कोटी अनुदान मंजूर केले.
1300 कोटींची योजना अंतिम टप्प्यात
गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळात होळपणार्या कागवाड तालुक्याला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेच्या कामालाही गती दिली आहे. 1300 कोटींच्या ही योजना अंतिम टप्प्यात असून डिसेंबरअखेर त्याचे काम पूर्ण करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. आता त्यांच्या पाठपुराव्यामुळे मतदार संघाला 230 कोटींचे अनुदान मिळाल्याने मतदार संघात आनंद व्यक्त होत आहे.
मतदारसंघात जल्लोष
अनुदान मंजूर झाल्याचे समजताच कागवाड, शेडबाळ, मदभावी, अनंतपूरसह अनेक गावांमध्ये गुरूवारी सायंकाळी फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री, पाटबंधारेमंत्री व आ. श्रीमंत पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. नुकतेच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले अनंतपूर जि. पं. मतदार संघाचे माजी सदस्य दादा शिंदे म्हणाले, श्रीमंत पाटील आमदार झाल्यानंतर मतदार संघाच्या विकासाला चालना मिळाली आहे. इतर विकासाबरोबरच त्यांनी शेतीला व पिण्यासाठी पाणी योजनेला अधिक महत्व दिले आहे. भविष्यात हा भाग सुजलाम सुफलाम होऊन हरितक्रांती घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अनंतपूर ग्रा. पं. अध्यक्ष अशोक हबगुंडे, मल्लेश मेत्री, सुनील होनकंडे, पांडू हबगुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta