Tuesday , December 9 2025
Breaking News

मराठी माणसाने संघटित होणे काळाची गरज : रमाकांत कोंडूसकर

Spread the love

 

बेळगाव : मराठ्यांवर सत्ता गाजवू पाहणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन एकीची वज्रमठ बांधली पाहिजे. आपल्या युवा पिढीला व्यसनाधीन बनविण्याचे काम हे राष्ट्रीय पक्ष करत आहेत. तेंव्हा त्यांची आमिष आणि व्यसनांना बळी न पडता, न झुकता मराठी माणसाने संघटित होऊन आपला मराठा बाणा दाखवणे ही काळाची गरज बनली आहे, असे परखड विचार श्रीराम हिंदुस्तान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले.

दीपावलीनिमित्त तुरमुरी (ता. जि. बेळगाव) येथील युवा मंचच्यावतीने आज आयोजित किल्ला राजगड या किल्ल्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तुरमुरी ग्रा. पं. उपाध्यक्ष चांगदेव बेळगावकर हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून म. ए. समितीचे युवा नेते आर एम. चौगुले हजर होते. रमाकांत कोंडुसकर आपल्या भाषणात म्हणाले की, आम्ही सर्व मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आणि मराठे कधीही कुणासमोर झुकलेले नाहीत. तेंव्हा मराठ्यांनी यापुढे राष्ट्रीय पक्षांसमोर न झुकता आपला बाणा ताठ ठेवला पाहिजे. राष्ट्रीय पक्ष मराठ्यांची कवडीमोल किंमत करत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. छ. शिवाजी महाराज व धर्मवीर छ. संभाजी महाराज आमचे दैवत आहेत.

गेली कित्येक वर्ष मराठ्यांवर हे राष्ट्रीय पक्ष आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही मराठ्यांनी जरी एकत्र आलो तर या राष्ट्रीय पक्षांचा कुठेही नामोनिशान लागणार नाही. त्यासाठी आपण एकमताने सर्व जण संघटित राहणे गरजेचे आहे.

आजच्या युवकांना व्यसनाधीन बनवण्याचे काम त्यांच्याकडून वारंवार होत आहे. त्यांच्याकडून थातूरमातूर आश्वासन व आमिषांना आमची जनता बळी पडते. मात्र यापुढे आमच्या युवकांनी व्यसनाकडे न झुकता आणि त्यांच्या आमिषाला बळी न पडता एक दिलाने संघटीत राहून आपला बाणा दाखवणे गरजेचे असल्याचे सांगून शिवाजी महाराजांचा अनेक लढवय्या बाणा आणि अनेक शूरवीर मावळ्यांच्या कथा त्यांनी यावेळी सांगितल्या.

युवा नेते आर. एम. चौगुले म्हणाले की, मराठी माणूस हा संघटित राहिलेला या राष्ट्रीय पक्षांना पाहवत नाही. त्यामुळे मराठी माणसांमध्ये फुट पाडण्याचे काम गेली कित्येक वर्षे हे राष्ट्रीय पक्ष करत आहेत. गेली 14 वर्षे आपला वनवास संपलेला आहे. त्यामुळे आता मराठी माणसाने संघटीत राहून आपला मराठी बाणा आणि आपण छ. शिवरायांचे वंशज आहोत हे दाखवण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय पक्षांचे नेते आम्हा मराठी माणसांच्या मतांवर निवडून येऊन मराठी माणसांनाच जाणून बुजून त्रास देण्याचे काम करत आहेत असे सांगून मराठी जनतेची कवडीमोल किंमत करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी संघटित होऊन मराठी बाणा दाखवणे गरजेचे आहे, असे मत चौगुले यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर सुरेश राजूकर, विनायक हुलजी, महेंद्र जाधव, रघुनाथ खांडेकर, आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील, एन. के कालकुंद्री, सागर कटगेण्णवर, अशोक चौगुले, चंद्रकांत जाधव ज्ञानेश्वर कोरडे, मारुती खांडेकर, यल्लाप्पा जाधव, ज्योतिबा जाधव, गौरव गेंजी, मारुती बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी युवा मंचचे विठ्ठल तंगाणकर, निखील देसाई, केतन निसंगे, विनायक गोजगेकर, योगेश डोणकरी, ऋषिकेश जाधव, प्रसाद चलवेटकर, सुदर्शन पाटील आदींनी उपस्थित मान्यवरांचे भगवा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय खांडेकर यांनी केले. कार्यक्रमास तुरमुरी आणि परिसरातील नागरिक आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजगड या छ. शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *