खानापूर : बेळगाव- चोर्ला राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची मागणी काही हॉटेल व्यावसायिक जांबोटी भागातील नागरिकांना हाताशी धरून करताना दिसत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग झाला तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात तसेच पर्यावरण लवादाकडे देखील धाव घेतली आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी अनमोड मार्ग, हेमाडगा मार्ग त्याचप्रमाणे आंबोली मार्गे देखील गोव्याला जाण्याचा मार्ग उपलब्ध असताना पर्यावरणाचा ऱ्हास करून चोर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग करण्याचा अट्टाहास कश्यासाठी? यामागे नेमका कोणता स्वार्थ दडला आहे? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडला आहे. चोर्ला- बेळगाव महामार्ग झाला तर बेळगाव-गोवा 40 किलोमीटर अंतर कमी होते. त्यामुळे व्यावसायिकांच्या दृष्टीने हे सोयीचे आहे असे सांगणारे काही रिसॉर्टचे मालक गोव्याचे ग्राहक सहजरित्या आपल्या रिसॉर्टला भेट देत व आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत होईल या स्वार्थी विचारात तर गुरफटले नाहीत ना? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी काही रिसॉर्ट मालक चक्क निसर्गच वेठीस धरू पहात आहेत. पर्यावरण प्रेमी हे विकासाच्या विरोधात आहेत असा आरोप काही लोक करताना दिसतात. पण निसर्गाचे जतन करून आहे तोच रस्ता नव्याने केल्यास बेळगाव- गोवा मार्गे प्रवास करणाऱ्यांना तसेच व्यावसायिकांना सोयीचे होईल व पर्यावरणाला धोका पोचणार नाही. खानापूर तालुका निसर्गाने नटलेला तालुका आहे. भीमगड अभयारण्य देखील याच तालुक्यात आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता जपली पाहिजे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाला तर याचा परिणाम जंगली प्राण्यांवर होईल. झाडांची कत्तल झाली तर त्याचा परिणाम निसर्गचक्रावर होईल त्यामुळे बेळगाव-चोर्ला मार्ग हा दुरुस्त करून वाहतुकीस मोकळा करावा व पर्यावरण वाचवावे.
जांबोटी, कणकुंबी या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन या भागात अनेकांनी रिसॉर्ट चालू केले आहेत. आता हेच रिसॉर्ट मालक आता आपले व्यवसाय वाढविण्यासाठी या भागातील ग्रामस्थांना हाताशी धरून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करावा यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मात्र खानापूर तालुक्यातील सुज्ञ जाणकारांनी यांचा कावा ओळखून पर्यावरण वाचविणे आवश्यक आहे.
Belgaum Varta Belgaum Varta