बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी श्रीगणेशोत्सवासंदर्भातील मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी, अशी विनंती कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सेक्रेटरी तसेच गणेश सेवा संघ आणि विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
किरण जाधव यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन उपरोक्त विनंती पत्र त्यांना सादर केले. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंत अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळली आहे.
तथापि मागील वर्षी कोरोनामुळे श्रीगणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले होते. आता यंदाचा श्रीगणेशोत्सव जवळ आला आहे. तेंव्हा कोरोनाचा धोका लक्षात घेण्याबरोबरच जनतेला हा उत्सव आनंदाने साजरा करता येईल या दृष्टिकोनातून योग्य अशी मार्गदर्शक सूची लवकरात लवकर जाहीर करावी, अशा आशयाचा तपशील जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात नमूद आहे.