
बेळगाव : मुसळधार पावसामुळे घरे गमावलेल्या बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राम पंचायत हद्दीतील विविध गावांतील पीडितांनी घरे वाटपाच्या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
कडोली कडोली ग्राम पंचायत हद्दीतील कडोली, केदनूर, हंदीगनूर, अगसगा आदी गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे 105 घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी या पीडितांनी सर्व अधिकार्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या आहेत. पण काही फायदा झाला नाही. म्हणून आता गुरुवारी त्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या पडझड झालेल्या घरांचे फोटो हातात धरून आंदोलन केले. त्यानंतर त्यांना तातडीने घरे देण्यात यावीत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले.
याप्रसंगी बोलताना केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी, 2020-21 मध्ये पडलेल्या घरांची भरपाई अद्याप मिळालेली नाही. तसेच 2021-22 मध्ये पडलेल्या घरांना कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकार्यांनी दक्षिण मतदार संघाचा दौरा केला असता 48 तासांत घरांचे वाटप झाले असून, आम्हाला घरे का दिली जात नाहीत, असा सवाल आमचे लोक करत आहेत. बसव गृहनिर्माण योजनेत चार वर्षांपासून घरे दिली जात नाहीत. 150 कुटुंबांना घरे मिळणे ही एक मोठी समस्या आहे. घरांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी स्वतः यावे किंवा पथक तरी पाठवावे. आपल्या पिकांचे नुकसान झाल्याने हैराण झालेल्या शेतकर्यांनी घरांचे नुकसान होऊन भविष्यात आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करू नये, अशी मागणी केली.
मुसळधार पावसाने आमच्या घरांची पडझड झाल्याचे यावेळी बोलताना अतिवृष्टी बाधितांनी सांगितले. आता राहायला घर नाही. मुलांना कुठे वाढवायचे आणि कसे जगायचे हेच कळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य चेतक कांबळे, यल्लाप्पा कडोलकर, हणमंत कंग्राळकर, वामन कंग्राळकर, कल्लाप्पा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पीडित यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta