बेळगाव : मुंबईतील श्रद्धा या हिंदू युवतीच्या लिव्ह इन पार्टनरने तिची निर्घृण हत्या करून 35 तुकडे करून फेकल्याच्या घटनेचा बेळगावात आज हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी श्रद्धाचा प्रियकर आफताब याला जाहीर फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
18 मे रोजी आफताब अमीन पूनावाला याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे प्रेयसी श्रद्धाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर, त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे करून तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले आणि अनेक दिवस शहरभर फेकून दिले. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणाचा निषेध करत हिंदू जनजागृती समिती रणरागिणीच्या कार्यकर्त्यांनी अटक केलेल्या खुनाच्या आरोपींविरोधात घोषणाबाजी करत त्याला फाशी देण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना आंदोलक महिलांनी श्रद्धाचा खून लव्ह जिहादमधून झाल्याचा आरोप केला. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे मुस्लिम पुरुष हिंदू महिलांशी विवाह करून त्यांचे धर्मांतर करतात. याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर, आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना धोकादायक लव्ह जिहाद रोखण्यासाठी आणि खुनी लव्ह जिहादींना फासावर लटकविण्यासाठी राज्यात कठोर कायदा लागू करण्याची विनंती केली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीच्या अनेक रणरागिणी, पदाधिकारी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta