बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथील घर कोसळून मयत झालेल्या कुटुंबातील भिमाप्पा खनगावी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करून त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच प्रत्येक मृतासाठी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना आज गुरुवारी सकाळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सहा मृतांसाठी सरकारतर्फे एकूण 30 लाखाचे धनादेश भीमाप्पा खनगावी यांच्याकडे सुपूर्द केले.
त्याचप्रमाणे काशव्वा होळप्पणावर या मयत मुलीच्या कुटुंबियांना 5 लाखाचा धनादेश दिला. धनादेश स्वीकारतेवेळी भीमप्पा खनगावी यांना शोक अनावर झाला होता. अतिवृष्टीमुळे घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील 6 जणांसह अन्य एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी रात्री 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास बडाल अंकलगी (ता. बेळगाव) येथे घडली. मृतांमध्ये एक पुरुष, तीन महिला आणि तीन मुलींचा समावेश आहे.
या दुर्घटनेबाबतची माहिती मिळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तात्काळ मृतांसाठी प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे वारसांना नुकसानभरपाईची रक्कम घोषित केली होती. भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत भिमाप्पा खनगावी यांच्या कुटुंबातील गंगवा भीमा खनगावी (वय 50), सत्यव्वा अर्जुन खनगावी (वय 45), पूजा अर्जुन खनगावी (वय 8), सविता भिमाप्पा खनगावी (वय 28), लक्ष्मी अर्जुन खनगावी (वय 15), व अर्जुन हनुमंत खनगावी (वय 45, सर्व रा. बडाल अंकलगी, ता. बेळगाव) यांच्यासह त्याच गावातील काशव्वा विठ्ठल होळेप्पणावर (वय 8) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या सर्व मृतांच्या वारसांना आज सरकारच्यावतीने जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज गुरुवारी सकाळी एकूण 35 लाख रुपयांचे धनादेश वितरित केले. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 2 लाख याप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज सकाळी बडाल अंकलगी येथे दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मृतांच्या वारसांना धनादेशाचे वितरण केले. यावेळी त्यांनी विधिलिखित कोणाला टळलेले नाही, मन घट्ट करा असे सांगून मृतांच्या वारसांचे सांत्वन केले. यावेळी धनादेश स्वीकारताना स्वत:च्या कुटुंबातील सहा जणांना गमावलेल्या भिमाप्पा खनगावी यांना शोक अनावर झाला आणि रडू कोसळले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्याचा खांदा थोपटवून त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बेळगावचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …