बेळगाव : बेळगावात नवरात्रौत्सव आणि दुर्गामाता दौड यांचं अतूट नातं आहे. हीच परंपरा कायम ठेवत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामाता दौडला शानदार प्रारंभ करण्यात आला.
दुर्गामाता दौडचे बेळगावातील हे 25वे रौप्यमहोत्सवी वर्ष. देश आणि धर्माच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी नवरात्रीतील 9 दिवस बेळगाव आणि परिसरातील अनेक गावात दुर्गामाता दौड काढण्यात येते. स्वच्छ पांढरेशुभ्र कपडे आणि भगवे फेटे परिधान केलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी एसपीएम रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर एसपीएम रोड, कपिलेश्वर कॉलनी आदी परिसरात मोजक्या धारकर्यांच्या सहभागाने दौड काढण्यात आली. यावेळी दौडच्या मार्गावर महिलांनी व युवतींनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी धारकर्यांवर फुले, फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्षे साधेपणाने, मोजक्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने दुर्गामाता दौड काढण्यात येत आहे. यावर्षीही प्रशासनाने आखून दिलेल्या मार्गावर साधेपणाने, मोजक्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने दौड काढत आहोत. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने कोरोनाचे संपूर्ण जगातून उच्चाटन होऊ दे, सर्वत्र शांतता नांदू दे आणि पुढच्या वर्षी जल्लोषात, भव्य दुर्गामाता दौड काढण्याची संधी मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. कपिलेश्वर मंदिराकडे आजच्या दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. यावेळी ध्येयमंत्राचे पठण करण्यात आले. मार्केट उपविभागाचे एसीपी कट्टीमनी यांनी ध्वजारोहण केले.
