बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकरी कार्यकर्ते कल्याणराव मुचळंबी यांच्यावर शेकडो जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी गोकाक तालुक्यातील सावळगी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या कल्याणराव मुचळंबी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बेळगावच्या अंजनेय नगर येथील निवासस्थानी व्यवस्था करण्यात आली होती.
गुरुवारी दुपारी सजविलेल्या वाहनातून मुचळंबी यांची अंतिम यात्रा निघाली. महांतेश नगर, अशोक सर्कल, संगोळी रायन्ना सर्कल, राणी चन्नम्मा सर्कल मार्गे अंतिम यात्रा सदाशिवनगर येथे पोहोचली. सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, जिल्ह्यातील एक शेतकरी नेतृत्व आणि शेतकर्यांचे कल्याणकारी म्हणून ओळखले जाणारे कल्याणराव मुचळंबी यांच्या निधनामुळे मोठा आघात झाला आहे. शेतकरी नेते नंजुडस्वामी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. शेतकर्यांची आंदोलने आणि लढे जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी हासिरू क्रांती या वृत्तपत्राची सुरुवात केली. बेळगावमधील यशस्वी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
शेतकरी नेते चोन्नप्पा पुजारी बोलताना म्हणाले, कल्याणराव मुचळंबी यांच्या निधनाने कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि सर्व शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
कल्याणराव मुचळंबी यांच्या पार्थिवावर सदाशिवनगर स्मशानभूमीत लिंगायत धर्माच्या विधीनुसार अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. यावेळी मुचळंबी परिवारातील सदस्य, विविध वृत्तपत्रांचे संपादक, त्यांचे चाहते, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह शेकडोच्या संख्येने जनता अंतिम दर्शनासाठी सहभागी झाली होती.
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/10/muchalambi.jpg)