कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने सुरक्षा यंत्रणेसह भाविकांचं धाबं दणाणलं.
दरम्यान, तात्काळ देवीच्या दर्शनासाठीची रांग थांबविण्यात आली. विशेष पथकासह श्वानपथक, बॉम्बशोध पथक व वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी मंदिर परिसराची कसून तपासणी केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर भाविकांसाठी आज खुले झाले. देवीची सकाळी पूजा बांधल्यानंतर दर्शन रांगेतून भाविकांना मंदिरात सोडले जात होते. मात्र, दुपारी चार वाजता पोलीस मुख्यालयात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला आणि पोलीस यंत्रणेची पळापळ सुरु झाली. तातडीने शोध पथकांद्वारे मंदिर परिसराची तपासणी सुरू झाली. भाविकांना याची माहिती मिळताच त्यांच्या मनातही भीती पसरली. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.
