बेळगाव : स्टार एअरलाईन्सच्या तिरुपती -बेळगाव -तिरुपती या आरसीएस उडान -3 योजनेअंतर्गत विमान सेवेला आजपासून समारंभपूर्वक प्रारंभ झाला आहे. तिरुपती हे स्टार एअरकडून बेळगावला जोडले जाणारे सातवे शहर आहे.
बेळगाव विमानतळावर आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात प्रमुख पाहुण्या खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्या हस्ते फित कापण्याससह दीप प्रज्वलन आणि केक कापून तिरुपती -बेळगाव -तिरुपती या विमान सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी स्टार एअरतर्फे खासदार मंगला अंगडी यांचे शाल श्रीफळ देण्याबरोबरच पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिरुपती विमानसेवेचे पहिले तिकीट खरेदी करणार्या प्रवाशाला खासदार अंगडी आणि बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते बोर्डिंग पास प्रदान करण्यात आला.यावेळी बोलताना खासदार मंगला अंगडी यांनी आठवड्यातील सोमवार आणि बुधवार असे दोन दिवस बेळगाव ते तिरुपती विमान सेवा सुरू केल्याबद्दल बेळगाव विमानतळाचे संचालक आणि स्टार एअरचे अभिनंदन केले. या विमान सेवेमुळे भगवान बालाजींच्या दर्शनाला जाणार्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. त्याचप्रमाणे तिरुपती आणि बेळगावच्या पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळणार आहे, असे खासदार अंगडी म्हणाल्या.
याप्रसंगी केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य चेअरमन एम. आर. कुलकर्णी, कीर्ती सर्जिकल्सच्या कीर्ती सुरंजन, विमानतळ टर्मिनल हेड पी. एस. देसाई, इलेक्ट्रिकल हेड सुधाकर नाईक, अग्निशमन दल प्रमुख मोहिनीशंकर, टर्मिनल मॅनेजर रेड्डी ब्रम्हानंद, शशिकांत यक्कर्नल्ला किरण एस., स्टार एअरचे उपव्यवस्थापक रकिब शरीफ आदींसह निमंत्रित आणि स्टार एअरचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बेळगाव विमानतळचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी विमानसेवा सुरू करणार्या स्टार एअरसह उपस्थित सर्वांचे आभार मानले.
स्टार एअरची तिरुपती -बेळगाव -तिरुपती ही विमान सेवा आठवड्यातील सोमवार व बुधवार असे दोन दिवस उपलब्ध असणार आहे. या दिवशी दुपारी 12:55 वाजता विमानाचे तिरुपतीहून बेळगावला आगमन होईल आणि दुपारी 1:20 वाजता तिरुपतीला प्रयाण होईल. प्रारंभी या विमानसेवेची आगमन आणि प्रयाणाची प्रवासी क्षमता 26 टक्के असणार आहे, कालांतराने ती वाढविण्यात येईल.
स्टार एअरने आपल्या विमान सेवेद्वारे सुरत, अहमदाबाद, जोधपुर, नाशिक, इंदोर, मुंबई आणि तिरुपती ही शहरे बेळगावशी जोडली आहेत. आता उडान -3 योजनेअंतर्गत जयपूर आणि नागपूर ही शहरे देखील बेळगावशी जोडण्यात यावीत अशी विनंती स्टार एअरलाइन्सकडे करण्यात आली आहे.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …