बेळगाव : रामकृष्ण वेदांत संस्था (सोसायटी) बोस्टन, अमेरिकेचे अध्यक्ष स्वामी त्यागानंदजी महाराज यांचे रामायणाची पूर्वकथा या विषयावर मराठीत विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. रामकृष्ण मिशन आश्रम किल्ला येथे दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता हे प्रवचन होणार आहे. स्वामी त्यागानंदजी महाराज हे रामकृष्ण मठात १९७६ मध्ये सहभागी झाले. सध्या ते रामकृष्ण वेदांत सोसायटीचे अध्यक्ष असून एम आय टी आणि हार्वर्ड विश्वविद्यालयात हिंदू धर्मोपदेशक आहेत. १९९८ मध्ये ते अमेरिकेत गेले. रामकृष्ण आश्रमाच्या वेदांत केसरी या इंग्रजी नियतकालिकेचे अकरा वर्षे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी दहा पुस्तके लिहून काही पुस्तकांचे भाषांतर केले आहे. प्रवचन, अध्यात्मिक वर्ग, मुलाखती आणि ध्यान धारणेच्या उपदेशातून आपले विचार लोकांच्या पर्यंत पोचवत आहेत. स्वामीजी अमेरिकन अकॅडमीचे सभासद आहेत. हिंदू ख्रिश्चन धर्म अध्ययन समितीचे ते सदस्य आहेत. त्यांच्या विशेष प्रवचनाचा बेळगावच्या जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे करण्यात आले आहे.