
येळ्ळूर हे पुरोगामी संघर्ष वृत्तीचे गाव म्हणून ओळखले जाते. कलिंगड, बासमती तांदूळ, मसूर, मोहरी, वाटाणा, मेरुल्या अश्या चवदार व पौष्टिक अन्नधान्य ही येळ्ळूरच्या काळ्या मातीची खासियत. या गावाने अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची जडणघडण केली त्यापैकी श्रीयुत रावजी महादेव पाटील. लक्ष्मी व महादेव यशवंत पाटील यांचे लहान चिरंजीव. 3 एप्रिल 1947 साली जन्म झालेले रावजी आप्पा.
रावजी पाटील हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा रहातो तो शांत चेहरा, स्मित हास्य, चष्म्यातून दिसणारे बोलके डोळे अशी लहान मूर्ती.
येळ्ळूर येथील मराठी मॉडेल स्कूल येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विश्वभारत सेवा समिती संचलित शिवाजी हायस्कूल येळ्ळूर येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण घेत असताना गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांच्या सानिध्यात जीवनाला एक प्रकारची शिस्त लागली व सार्वजनिक कामाची आवड निर्माण झाली. दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरपीडी महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश मिळविला. शिक्षणाची आवड असून देखील घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे रावजी पाटील यांना आपले शिक्षण थांबवावे लागले.
1970-1971 च्या दरम्यान त्यांनी मुंबई (भांडुप) येथे ब्लो फास्ट या कंपनीत नोकरी स्वीकारली. काम करण्यातूनच माणसाची एक वैशिष्ट्यपूर्ण मानसिकता जोपासली जाते व माणूस अधिक प्रगल्भ बनत जातो असेच काहीसे रावजी आप्पांच्या बाबतीत घडले. थोड्याच दिवसात घरच्या अडचणीमुळे आप्पांना मुंबई सोडून गावी परत यावे लागले. गावी परत आल्यानंतर पुन्हा त्यांनी शेतीकडे वळले.
1975 साली सौ. विजयमाला यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. आप्पांना वाचनाची आवड असल्यामुळे येळ्ळूर येथील बालशिवाजी वाचनालयात ते नेहमी जात असत. त्यामुळे बा. वी. पाटील, सिद्दाप्पा गिंडे गुरुजी, प्रा. सी. व्ही. पाटील, सिद्दोजी मुरकुटे, डॉ. रामचंद्र मेणसे या जेष्ठ मंडळींशी स्नेह जुळला. येळ्ळूर गाव सीमालढ्यात अग्रणी असल्यामुळे सीमा चळवळीत आप्पांचा सहभाग वाढला व समितीच्या नेत्यांचा सहवास मिळाला. 1987 साली येळ्ळूर मंडळ पंचायतीत बिनविरोध निवड झाली. जनतेला आपले प्रश्न सोडविणारा एक उमदा नेता मिळाला. कै. उमाजी तोपिनकट्टी व श्री. वाय. एन. मजुकर यांच्या निवड समितीने येळ्ळूर मंडळ पंचायतीचा प्रधान म्हणून निवड केली. प्रधान म्हणून येळ्ळूर गावाची दोन वर्षे सेवा करण्याची संधी रावजी पाटील यांना मिळाली.
म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली अनेक लढे लढविले. साराबंदीपासून ते कालपरवाच्या महामेळाव्यापर्यंतच्या प्रत्येक लढ्यात रावजी आप्पा अग्रणी आहेत.
आप्पांचे ज्ञान व काम हे केवळ पुस्तकी नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले. सर्वांशी मैत्रीचे व सलोख्याचे संबंध. आप्पा कृतिशील कार्यकर्ता म्हणून सर्वत्र वावरत असत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा. क्रोध, लोभ, मोह, मत्सर आप्पाना कधीच शिवला नाही. आयुष्याच्या चढउतारातून अनुभव घेत आकारास आलेले एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात सभ्यतेची झालर पहावयास मिळते. त्यांच्याकडे पाहताच ते एक ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहे हे प्रकर्षाने जाणवते.
काकती बेळगांव येथील मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक असताना कारखाना पूर्णत्वास येण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. ते पाच वर्षे तालुका पंचायत सदस्य म्हणून जनतेची सेवा केली. त्यावेळी त्यांनी गटनेतेपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कुटुंबाकडे लक्ष देण्याचे काम त्यांच्या सौभाग्यवती विजयमाला यांनी यशस्वीरित्या केले. मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिले. आज त्यांची तिन्ही मुले उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांचा मोठा मुलगा महादेव हे डॉक्टर आहेत ते सध्या ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास आहेत. मुलगी सौ. विजयालक्ष्मी या एम.ए. बीएड असून प्राध्यापिका म्हणून सेवा बजावत आहेत. तर लहान मुलगा संदीप हे केमिकल इंजिनीयर असून हिंडाल्को कंपनीमध्ये असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. एक भाऊ, तीन बहिणी असलेल्या रावजी महादेव पाटील अश्या सुसंस्कृत व्यक्तीचा आज आपण अमृत महोत्सव साजरा करीत आहोत.
जिवेत: शरद; शतम:
Belgaum Varta Belgaum Varta