Thursday , April 17 2025
Breaking News

काळादिन मोर्चात बेळगाव शिवसेनेचाही सहभाग

Spread the love

बेळगाव : मराठी भाषिकांवर अन्याय आणि कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या 25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार्‍या मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होऊन संपूर्ण पाठिंबा दर्शवण्याबरोबरच 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या फेरीत ताकदीने उतरण्याचा निर्णय बेळगाव शिवसेनेने जाहीर केला आहे.
शिवसेनने (सीमाभाग -बेळगाव) आज गुरुवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपरोक्त निर्णय जाहीर केला आहे. बेळगाव शहर, तालुका व जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने मोर्चा आणि सायकल फेरीमध्ये सहभागी होऊन मराठी माणसांची ताकद दाखवून देणार आहेत.
तरी मराठी अस्मिता टिकविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर वारंवार होणारा अन्याय आणि कानडीकरणाच्या वरवंट्याचा निषेध करण्यासाठी समस्त मराठी युवक-युवती व महिलांनी बहुसंख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या भूलथापांना बळी न पडता मराठी अस्मिता टिकवा. राष्ट्रीय पक्ष फक्त राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाचा उपयोग करत आहेत. शिवसेना कायम मराठी भाषिकांचा सोबत असून सीमाप्रश्न सुटेपर्यंत ती कधीही गप्प बसणार नाही. सीमाप्रश्नासाठी व कन्नडसक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांच्या आत्म्याला शांती मिळायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करावा, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे शिवसेना शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे, वैजनाथ भोगण, निरंजन अष्टेकर, प्रकाश भोसले, संजय चतुर, बाळासाहेब डंगरले, राजू कणेरी, प्रदीप सुतार, नारायण पाटील, बबन लोहार, सुभाष कालकुंद्रिकर आदींनी मराठी बांधवांनी बहुसंख्येने मोर्चा आणि काळा दिन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *