Saturday , October 19 2024
Breaking News

इस्कॉनच्या 25व्या हरे कृष्ण रथयात्रेस उत्साहात प्रारंभ : आज, उद्या विविध कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या 25व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्याशी परमपूज्य राम गोविंद स्वामी महाराज, भक्ती रसामृत स्वामी महाराज, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, परमपूज्य चंद्रमौली महाराज आणि भक्तीचैतन्य सूंदर महाराज यांच्या हस्ते रथाची पूजा करून चालना देण्यात आली. याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, शंकरगौडा पाटील, रमाकांत कोंडूसकर, कनुभाई ठक्कर यांच्यासह इस्कॉन चळवळीतील अनेक ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. बेळगाव जिल्हा आणि देशाच्या विविध भागातून आलेले इस्कॉनचे हजारो स्त्री-पुरुष भक्त या रथयात्रेत सहभागी झाले होते. या रथयात्रेच्या प्रारंभी बोलताना भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी सर्वांचे स्वागत केले आणि ’हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव हा अनेक वर्षापासून जगभरात सुरु असलेला उत्सव असून तो इतर सर्वसामान्य उत्सवा सारखा नाही. शाश्वत राहणार्‍या या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आज उद्या व परवा इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या मंडपात होणार्‍या विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाला बेळगावकरांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

फूलानी सजविलेला रथ व गरुडाच्या रुपातील फूलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रथयात्रेच्या निमित्ताने सजविलेल्या रथामध्ये श्री हरे कृष्ण, राधामैया व गौर निताय यांचे आर्च विग्रह ठेवलेले होते. दुसर्‍या एका खास रथात इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांचा पुतळा ठेवलेला होता. रथाला जोडलेले दोरखंड ओढत भक्तगण हा रथ संभाजी चौकातून कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार ,गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, रेल्वेओव्हर ब्रिजवरून कपिलेश्वर रोडमार्गे खडेबाजार शहापूर, आयुर्वेदिक कॉलेज रोडवरून गोवावेस मार्गे सायंकाळी सहा वाजता टिळकवाडीतील इस्कॉन मंदिराकडे पोहोचला आणि तेथे रथयात्रेची सांगता झाली.

रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी रथयात्रेवर पुष्पवृष्टी केली गेली. या रथयात्रेच्या अग्रभागी रंगोली काढणारी 5 पथके होती त्यापाठोपाठ शृंगारलेल्या सुमारे 20 बैलजोड्या, भजन -कीर्तन मध्ये तल्लीन झालेले हजारो भक्त भगवान श्रीकृष्णाचा नामोच्चार करीत पुढे सरकत होते. विद्यार्थी मल्लखांबाची प्रात्यक्षिके आणि दोरीचे खेळ दाखवत होते. भगवान श्रीकृष्णाच्या लीला सादर करणारे अनेक प्रसंग तसेच रामायणातील अनेक प्रसंग विविध गाड्यांवर सादर केले जात होते. भजनी मंडळीचे भजन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आज देशाच्या विविध भागात रथयात्रा होत असली तरीही इस्कॉन मध्ये बेळगावच्या रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. अभूतपूर्व उत्साह असलेली ही रथयात्रा म्हणजे जनतेला दर्शन देण्यासाठी साक्षात भगवंतच रस्त्यावर उतरलेले होते.

ठीकठिकाणी फळे, सरबत व पाणी वितरण केले जात होते. सायंकाळी इस्कॉन मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस उभारलेल्या विविध स्टॉल्सवर खाद्यपदार्थांची व इस्कॉनच्या विविध उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

भजन, प्रवचन, कीर्तन आणि ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने व नाट्य लीला झाली त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद झाला. रविवार दि. 29 जानेवारी रोजी सायंकाळी 4 नंतर वैष्णव यज्ञ व इतर उपक्रम होतील तसेच रात्री सर्वांना महाप्रसाद होईल त्याचबरोबर सोमवार दि. 30 जानेवारी रोजीही अनेक अध्यात्मिक कार्यक्रम व सर्वांसाठी महाप्रसाद होईल. या सर्व उपक्रमात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी केले आहे.

टिळकवाडीचे पी.एस.आय. दयानंद हे आपल्या सहकार्‍यांसमवेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत रथयात्रेत सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *