25 रोजीचा मोर्चा होणारच
बेळगाव (वार्ता) : कायद्याप्रमाणे त्रिभाषा सूत्रानुसार कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सरकारी परिपत्रके देण्याबरोबरच फलकांवरही मराठीचा अंतर्भाव केला जावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज पुनश्च जिल्हाधिकार्यांकडे केली. तसेच 25 ऑक्टोबर रोजीच्या मोर्चाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे जिल्हाधिकार्यांना सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या आजच्या बैठकीस मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखालील अन्य समिती नेते उपस्थित होते.
यावेळी कन्नड सक्तीमुळे भाषिक अल्पसंख्यांक असणार्या सर्वसामान्य मराठी लोकांना कन्नड समजत नसल्यामुळे त्यांची होणारी गैरसोय त्यांना होणारा त्रास याची माहिती जिल्हाधिकार्यांना देण्यात आली गेल्या 15 वर्षापासून सरकारी परिपत्रके कन्नडसह मराठी भाषेतही दिली जावी अशी आमची मागणी आहे. तथापि अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही असे यावेळी सांगण्यात आले. तसेच या संदर्भात आजतागायत जिल्हाधिकार्यांची झालेल्या बैठकाचा तपशील देण्यात आला. माजी आमदार किणेकर यांनी भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या भाषेतील सरकारी परिपत्रके देण्याबाबतचा कायदा व केंद्र सरकारच्या आदेशांचा कागदोपत्री पुरावा देखील जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिला.
सरकारी परिपत्रकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्याच्या मागणी बरोबरच सरकारी कचेरी व सार्वजनिक ठिकाणी असणार्या फलकांवर त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा देखील वापर करावा अशी मागणी पुनश्च करण्यात आली. त्याप्रमाणे बेळगाव महापालिकेसमोरील वादग्रस्त लाल-पिवळ्या झेंड्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. तसेच ठोस निर्णय घेऊन तो झेंडा तात्काळ हटविण्याची मागणीही करण्यात आली.
समितीच्या शिष्टमंडळातील मंडळींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी फलकांवर मराठीचा वापर करावा याबाबतच्या सूचना देण्यात आल्याचे सांगून अंमलबजावणीसाठी 15 दिवसांची मुदत मागितली. तसेच सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. मात्र येत्या 25 ऑक्टोबर रोजी करण्यात येणारा मोर्चा आपण मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी समितीच्या नेते मंडळींकडे केली.
यावर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लोकशाही मार्गाने आमचा लढा चालूच राहील असे सांगून मोर्चाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे म. ए. समितीच्या नेतेमंडळींनी स्पष्ट केले.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, रणजीत चव्हाण -पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
Check Also
सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
Spread the love बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. …