

भाजप नेते किरण जाधव; विमल फौंडेशन चित्रकला स्पर्धेला आडकाठी, स्पर्धेपासून हजारो वंचित
बेळगाव : चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत लपलेल्या सुप्तगुणांना दरवर्षी विमल फौंडेशनकडून व्यासपीठ मिळते. कलेच्या माध्यमातून मुले रंगात न्हाऊन निघतात. यंदा मात्र शिक्षण खात्याचा गलथान कारभार व तकलादू निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे हजारो विद्यार्थी स्पर्धेपासून वंचित राहिले त्यामुळे पालकवर्ग तसेच भाजप नेते किरण जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रकला स्पर्धेच्या आडून अधिकाऱ्यांना चित्रकला स्पर्धेला आक्षेप घेण्यास भाग पाडणाऱ्या कृतीचा निषेध केला आहे. तसेच शहर गट शिक्षणाधिकाऱ्याच्या गलथान कारभाराची तक्रार मुख्यमंत्र्याकडे तक्रार देण्यात येईल, असे विमल फौंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी म्हटले आहे.
येथील विमल फौंडेशन तर्फे दरवर्षी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते मात्र यावर्षी राजकीय आकसापोटी शिक्षण खात्यावर दबावतंत्र वापरून सदर स्पर्धेत आडकाठी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत बोलताना भाजपा नेते किरण जाधव म्हणाले की, शिक्षण खात्याने राजकिय दबावामुळे या स्पर्धेला आक्षेप घेतला होता. त्यामुळे शहरातील हजारो विद्यार्थी आपल्यातील कलागुण प्रदर्शित करण्यापासून वंचित राहिले. शहरातील एकूण 78 शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकाच वेळी विविध शाळेत ही स्पर्धा भरविण्यात येणार होती. विमल फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेत चित्रकला स्पर्धेसाठी लागणारे साहित्य वितरण केले होते. मात्र रविवारी सकाळी अचानक शिक्षण खात्याकडून स्पर्धा भरविण्यास परवानगी नाकारल्यामुळे संबंधित शाळांनी स्पर्धा भरविण्यास अनास्था दाखविली. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ज्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन आदेश बजावला आहे. त्याचा जाब विचारणार आहे. सर्व शाळा, कॉलेज प्रशासनाला विश्वासात घेऊन स्पर्धा आयोजिली होती. कोणतेही राजकारण त्यामागे नव्हते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा हेतू असताना दीड लाख मुलांनी नाव नोंदविले होते. तर 78 हजाराहून अधिक मुले सहभागी होणार होती. मात्र अचानक गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश बजाविल्यामुळे स्पर्धकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळे बरेच विद्यार्थी स्पर्धेपासून वंचित राहिले. आपण स्पर्धेच्या माध्यमातून राजकारण करत नसून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित करतो. अशा स्पर्धांना आडकाठी आणण्यामागे नेमके कोण आहे? हे बेळगावातील सुज्ञ जनता, पालक व विद्यार्थी जाणून आहेत.
स्पर्धेदरम्यान झालेल्या गोंधळामुळे पालक व विद्यार्थी नाराज आहेत.
बेळगावात राजकीय पातळी किती खाली घसरली आहे, त्याचे हे प्रतिनिधीक उदाहरण आहे. वेळोवेळी आडकाठी घालणाऱ्या नेत्याला नक्कीच त्याची जागा जनता दाखवून देईल, अशी संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
मराठी साहित्य संमेलन, मेळाव्याला आडकाठी घालण्याचे काम अनेकदा झाले. आता चित्रकला स्पर्धानिमित्त त्याची री ओढली जात आहे. किरण जाधव यांना राजकीय शह आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डिवचण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे का, अशी चर्चा या निमित्ताने
सुरु झाली आहे.
—————————————————-
आगामी विधानसभेचे संभाव्य उमेदवार ‘आपल्या कामाचा माणूस’ या बॅनरखाली भाजप नेते किरण जाधव अविरत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यातून त्यांचा प्रचंड जनसंपर्क वाढला आहे. यामुळे त्यांच्याकडे आगामी विधानसभेचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. या पोटतिडकीतून स्पर्धेला आडकाठी घातली जात असल्याचा आरोप आहे.
Belgaum Varta Belgaum Varta