बेळगाव : जय भारत फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी अवयव दान जागृती साठी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी यांनी पत्रकार परिषद बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना रामगुरवाडी म्हणाले, 16 ते 34, 35 ते 49, 50 वर्षे आणि त्यावरील धावपटूंसाठी 21, 10, 5 कि.मी. अशा स्वतंत्र श्रेणीत सदर हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतातील दोन ते चार हजार धावपटू सहभागी होतील.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण साडेतीन लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व नोंदणीकृत धावपटूंना आकर्षक पदके,चांगल्या दर्जाचे टी-शर्ट, ई-टाइमिंग प्रमाणपत्र, त्याचबरोबर शर्यती दरम्यान हायड्रेशन सपोर्ट, वैद्यकीय मदत व इतर सुविधाही देण्यात येणार आहेत.
26 फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजता सीपीएड मैदानावरून शर्यतीला प्रारंभ होईल. या शर्यतीचे टायटल स्पॉन्सर जय फाऊंडेशन आहेत. त्याचबरोबर बीपीसीएल या शर्यतीचे सहयोगी प्रायोजक आहेत. मोहन फाउंडेशनच्या सहकार्याने अवयवादानाची मोहीम पुढे चालविण्यात येणार आहे. रन इंडिया वेबसाईटवर धावपटूंची नोंदणी सुरू आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी आहे. अधिक माहितीसाठी धावपटूंनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. 25 फेब्रुवारी रोजी नोंदणी केलेल्या धावपटूंना चेस्ट नंबर / बीब नंबर आणि कार्यक्रमाचे टी-शर्ट वाटप देण्यात येतील. सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने बेळगाव शहरातील नागरिकांनी बेळगावच्या या सर्वात जुन्या मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही रामगुरवाडी यांनी केले.
यावेळी धावपटू मयुरा शिवलकर, रोहन हरगुडे, इंद्रजीत हलगेकर यांच्या हस्ते टी-शर्ट अनावरण करण्यात आले. पंकज पवार, जगदीश शिंदे, महेश अनगोळकर,अश्विन हुबळी, डी. बी. पाटील आणि मोहन फाउंडेशनच्या शीतल मुंदडा यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta