Tuesday , May 28 2024
Breaking News

‘तो’ व्यवहार्य तोडगा जनतेसमोर मांडावा

Spread the love

मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एकेकाळी सुचविलेला व्यवहार्य तोडगा अंमलात आणावा. याकडे महाराष्ट्रातील नेतेमंडळींचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या शनिवार दि. 30 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सरचिटणीसांनी संबंधित तोडग्याबाबत खानापूर समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संबंधित व्यवहार्य तोडगा आणि सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी प्रसिद्धीस पत्रक देऊन सदर मागणी केली आहे. खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सीमाप्रश्नासाठी कोल्हापूर येथे धरणे कार्यक्रम आयोजित केल्याचे वृत्तपत्रातून वाचावयास मिळत आहे. याचवेळी महाराष्ट्रातील नेते मंडळींनी व्यवहार्य तोडगाचा विचार करून सीमाप्रश्न सोडवावा असे आवाहनही केले आहे.
हा ‘व्यवहार्य’ तोडगा काय आहे याबाबत मात्र त्यांनी मौन पाळले आहे. या तोडग्याला सीमाभागातील कांही नेत्यांनी विरोध केला होता अशी माहितीही त्यांनी दिली आहे. सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यापासून त्याच्यामध्ये तसूभरही प्रगती झाली नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
सीमाप्रश्नाबाबतचा व्यवहार्य तोडगा काय आहे? आणि त्याला कोणी विरोध केला? याची दिगंबर पाटील यांनी सीमाभागातील जनतेला संपूर्ण माहिती द्यावी. त्यामुळे जनतेलाही या आंदोलनात भाग घेण्यास आणि महाराष्ट्रातील नेते मंडळींना जाब विचारण्यास सोपे जाईल. दावा दाखल करण्यासाठी खानापूर समितीचे मोठे योगदान आहे असे म्हणणार्‍या खानापुरातील मंडळींनी दावा दाखल झाल्यापासून कांही घडलेच नाही असे म्हणणे ठीक नाही. तेंव्हा दाव्याबाबतही दिगंबर पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी समस्त जनतेला नेमकी माहिती द्यावी.
व्यवहार्य तोडगा याबाबत महाराष्ट्र सरकारकडे कांही माहिती असल्यास सरकारनेही याबाबत महाराष्ट्राच्या वकिलांना माहिती देणे आवश्यक आहे. दाव्याच्या सुनावणीसाठी प्रयत्न चालू असताना वेगळ्या दिशेला सीमाप्रश्न घेऊन जाण्याच्या या प्रकाराकडे समन्वयक मंत्र्यांनी देखील लक्ष घालणे आवश्यक आहे, अशा आशयाचा तपशील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

About Belgaum Varta

Check Also

हडलगा येथे बसची सोय करा; विद्यार्थी, समितीची मागणी

Spread the love  खानापूर : हडलगा येथे बस फेरी सुरू करावी याचे खानापूर तालुका महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *