महाराष्ट्र एकीकरण खानापूर युवा समितीतर्फे इशारा
बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांची बस सेवा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला आहे.
युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी खानापूर बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक आनंद शिरगुप्पीकर यांची भेट घेऊन बस सेवा सुरळीत करण्याबाबत चर्चा केली. यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील यांनी कोरोनाच्या संकटामुळे अनेक दिवस बस सेवा बंद होती. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर परिवहन खात्यातर्फे विविध ठिकाणी जाणाऱ्या बसेस पूर्ववत केल्या आहेत. मात्र खानापूर तालुक्यातील बस सेवा अजूनही पूर्ववत झालेली नाही त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील विविध गावांना यापूर्वी सुरू असलेली बस सेवा पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने लोकांमध्ये नाराजी असल्याची माहिती दिली.
सचिव सदानंद पाटील यांनी खानापूर तालुक्याच्या विविध गावांमधील विद्यार्थी खानापूर, नंदगड, जांबोटी, बीडी आदी भागातील गावांमध्ये शिक्षणासाठी ये-जा करतात तसेच बेळगावला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे मात्र बसची संख्या अतिशय कमी असल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे याची दखल घेत तातडीने बस सेवा सुरळीत करावी अशी मागणी केली.
यावेळी आगार प्रमुख शिरगुप्पीकर यांनी आपण चार महिन्यांपूर्वीच खानापूर ला आलो आहे. त्यामुळे कोणत्या गावात बस सेवा सुरू होती व सध्या कोणत्या गावातील बससेवा बंद आहे याची माहिती द्यावी. त्यानंतर याबाबत योग्य ती कारवाई करण्यात आली असे आश्वासन दिले.
यावेळी राजू पाटील, मारुती गुरव, किशोर हेब्बाळकर, आनंद जुंजवाडकर, ज्ञानेश्वर सनदी, निलावडे ग्रामपंचायत अध्यक्ष संजय कांबळे, सदस्या वंदना हणबर, विशाल बुवाजी, संकल्प शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.