बेळगाव : गेल्या 66 वर्षापासून कर्नाटकाच्या जोखंड्यात अडकलेल्या सीमाभाग जोपर्यंत महाराष्ट्रात विलीन होत नाही, तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत नाही. सीमाभागातील नागरिकांना कर्नाटक सरकारच्या कानडी सक्तीच्या वरवंट्याखाली वागाव लागत आहे, या जुलमी अन्याय अत्याचाराविरुद्ध गेली 66 वर्ष सीमा भागातील मराठी भाषिक लोकशाहीच्या मार्गाने लढत आहे. या मराठी भाषिकांची महाराष्ट्रात विलीन होण्याची तळमळ तितक्याच तीव्रतेची आजही आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील लोकांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या तरीही तो भाग महाराष्ट्रात विलीन झाल्यावरच तेथील जनतेचा खऱ्या पद्धतीने विकास होईल. तेव्हा लवकरात लवकर सीमाप्रश्न सुटवा व सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय द्यावा ही मागणी घेऊन हजारो सीमावासिया मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडत होते. या धरणे आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी महाराष्ट्र गीत सादर करून या धरणे आंदोलनात सुरुवात करण्यात आली.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक करून म्हणाले की, सीमाभागातील नागरिक मोठ्या आशेने, एकच ध्येयाने, तत्त्वाने आज मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन धरत आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली परंतु बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी असा 25 लाख लोकांचा सीमाभाग आजही कर्नाटकाच्या जोखंडात अडकून पडला आहे. येथील मराठी भाषिकांची एवढीच मागणी आहे की आम्हाला आमच्या मातृभाषेच्या राज्यात राहायचं आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीतील आंदोलने, मोर्चे, उपोषणे, सत्याग्रह, साखळी उपोषण, धरणे आंदोलन, पायी मोर्चा, मोटरसायकल फेरी, साराबंदी अशी अनेक आंदोलने करत 2004 रोजी हा प्रश्न सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला. परंतु अजून सीमावासियांना न्याय मिळाला नाही, महाराष्ट्रातील सरकारने हा सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडून सीमाभागातील नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा यासाठी सीमाभागातील नागरिक या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. या धरणे आंदोलनाला महाराष्ट्राचे आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भरत गोगावले, माजी मंत्री आमदार छगन भुजबळ, सीमा समन्वयक मंत्री मंत्री शंभूराजे देसाई, सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील,आदींनी आंदोलनामध्ये भाग घेतला.
यावेळी शंभूराजे देसाई म्हणाले की, हा लढा अत्यंत अस्मितेने लढणारा लढा आहे. गेल्या अनेक वर्षे सीमा भागातील नागरिक आपल्या मातृभाषेच्या राज्यात येण्यासाठी लढा देत आहे, या लढ्याची जाणीव आम्हाला असून हा भाग लवकरात लवकर महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करील असे ते म्हणाले.
यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनामध्ये मी वेषांतर करून आंदोलनात भाग घेतला होता, पण आज 36 वर्ष सुलटली तरी सीमा भागातील नागरिक या लढ्यासाठी निष्ठेने लढत आहेत, खरं तर हा लढा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासारखा आहे. तरी सीमा भागातील नागरिकांसाठी न्याय देण्यासाठी सहभाग घेऊन लढा संपवू असे म्हणाले.
यावेळी आमदार रोहित दादा पवार म्हणाले की, मागच्या तीन महिन्यापूर्वी बेळगाव भेटीदरम्यान मी हुतात्मा स्मारक, येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देली तसेच ज्योतिबा मंदिरला ही भेट देऊन सीमा लढ्यातील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, तेथील जनता ही सीमा भागात येण्यासाठी लढत आहेत आणि त्यांच्या लढ्यात आमचे पवार कुटुंबीय अत्यंत पहिल्यापासून सहभागी झाले आहेत. १९८६ साली कन्नड सक्ती आंदोलनात शरचंद्र पवार साहेब यांनीही सहभाग घेऊन या आंदोलनात कानडी पोलिसांची लाठी देखील खाल्ली होती. तेव्हा साऱ्या या लढ्याची जाणीव आम्हाला असून सीमा प्रश्न सुटला तरच या भाषिकांना न्याय मिळेल, तेव्हा महाराष्ट्रातील सर्व पक्षांना गांभीर्याना लढ्याचे महत्त्व जाणून घेऊन येणाऱ्या काळात हा प्रश्न सोडून घेऊन मराठी अस्मिता टिकावेली पाहिजे. यावेळी सीमा भागातील आर. एम. चौगुले, ऍड. सुधीर चव्हाण, माजी महापौर शिवाजी सुंठकर, महापौर सरिता पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, बिदर महाराष्ट्र एकीकरण समितीची चिटणीस पृथ्वीराज पाटील, निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, खानापूर महाराष्ट्र एकीकरण अध्यक्ष गोपाल देसाई, आबासाहेब दळवी, तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. लवकरात लवकर हा सीमाभाग महाराष्ट्रात सामील करून घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र करण्यात आली. सरकारच्या वतीने सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील यांनी धरणे आंदोलनात भेटीवेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संदेश पोहोचविला. परंतु सीमा भागातील नागरिकांची एकच मागणी होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणे आंदोलनात भेट देऊन सीमावासीयांना पाठिंबा व्यक्त करावा, अशी मागणी सीमावासीयातून केली जात होती. सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई व चंद्रकांत पाटील यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवली, या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न तातडीने केले जाईल व लवकरात लवकर हा सीमा प्रश्न सोडवला जाईल, अशी ग्वाही दिली. शेवटी राष्ट्रगीत म्हणून धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.