येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने मराठी भाषा दिनाचे आयोजन
येळळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने सोमवार( ता. 27) फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या हॉलमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक व कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औवचित साधून मराठी भाषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष तानाजी हलगेकर, साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, सचिव डॉ. तानाजी पावले, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, सुभाष मजूकर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आगसगे येथील श्रीमती लीलावती व्यंकटेश करगुपीकर हायस्कूलचे शिक्षक युवराज पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायिले. त्यानंतर येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष तानाजी हलगेकर यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रस्ताविक साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी केले. यावेळी बोलताना शिक्षक युवराज पाटील म्हणाले, मातृभाषेतूनच शिक्षण घेतल्यामुळे माणूस प्रगल्भ होतो, मराठी भाषा ही एक भाषा नसून ममतेचे व वात्सल्याचे प्रतीक आहे, प्रत्येकाने मराठी भाषा जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, भाषा मेली तर समाज मरतो आणि समाज मरतो तेव्हा संस्कृती नष्ट होते, त्यामुळेच मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे. इंग्रजीचे मराठी भाषेवर आक्रमण होत आहे, मातृभाषा जगली पाहिजे यासाठी तुम्ही तुमच्या बोली भाषेचे संवर्धन केले पाहिजे, आजच्या पिढीनेही मराठी भाषेचा गोडवा व सुंदरता समजून घ्यायला हवी, मराठी भाषेचे वैभव टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे, घराघरातून मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे, त्यानी मराठी भाषेच्या अनेक गंमती जमती विद्यार्थ्यांना सांगितल्या. त्याचबरोबर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी वर्षभर कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, फक्त एकच दिवस मराठी भाषा दिन साजरा करून चालणार नाही, त्यासाठी वर्षभर कार्यक्रम राबविले पाहिजेत, आपल्या रोजच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषेतून शिक्षण घेतल्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते तसेच भाषाही समृद्ध होते यासाठी प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्याध्यापक एम बी बाचीकर यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी आपण काय- काय केले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी.एम गोरल यांनी केले तर आभार शिक्षक संजय मजूकर यांनी मानले. यावेळी शिक्षक विद्या पाटील, रेखा पाटील, संजय मजूकर, एच एस लोकळूचे, एम. बी. पंथर, एच. एस. धामणेकर, महादेव घाडी, नारायण नंदीहळ्ळी, एस. पी. मेलगे यांच्यासह श्री शिवाजी विद्यालय, व्ही.बी.एस.एस. गर्ल्स स्कूलचे विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta