बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नावर (वय 68) यांचे गुरुवारी दि. 2 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ व असा मोठा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शुक्रवार 3 मार्च रोजी 10:30 पर्यंत भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या प्रांगणात व त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत हिंदवाडी येथील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी दि.3 मार्च रोजी दुपारी 1 वाजता शहापूर रुद्रभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते कोमलअण्णा दोड्डन्नावर यांचे ते चिरंजीव होत. राजीव यांनी समाजाच्या अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, जैन शैक्षणिक संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष आणि कमलाबस्ती पूजा समितीचे अध्यक्ष होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात महावीर जयंतीचे आयोजन केले जात आहे. 2005 मध्ये त्यांनी बेळगावात तरुणसागर महाराजांचा चातुर्मास आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. खानापूर तालुक्यातील कसमलगी येथे सापडलेल्या 11व्या शतकातील पार्श्वनाथाच्या मूर्तीचे भव्य मंदिर बांधण्यातही त्यांचा सहभाग होता.
30 वर्षांहून अधिक काळ भरतेशच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक नवीन आणि क्रांतिकारी प्रकल्प राबवून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजकारण, तंत्रज्ञान, क्रीडा, साहित्य, धर्म आणि शिक्षण यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
Belgaum Varta Belgaum Varta