बेळगाव : राजहंसगड येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण गुरुवारी (2 मार्च) कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे हस्ते झाले आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले होते.
राजहंसगडावर स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचा अनावरण सोहळा रविवारी (ता. 5) पुन्हा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आयोजित करण्याचा निर्णय राजहंसगड ग्रामस्थांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार असून त्यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केल्याने मराठी भाषिकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी स्वतः मी (खासदार डॉ. अमोल कोल्हे) कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे म्हटले असून बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केलायं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मा. शरद पवार साहेब हे सीमाप्रश्नी नेहमी आक्रमक व अग्रेसर असतात. तेव्हा अमोल कोल्हे यांनी प्रत्येक ठिकाणी अभिनेत्याच्या वलयातून बाहेर पडून पक्षाच्या भूमिकेशी एकरूप झाले पाहिजे. तसेच त्यांनी स्वतः अनेकदा बेळगाव प्रश्नावर आवाज उठवला आहे; पण व्हिडिओत ते बेळगावला बेळगावी असे संबोधून आपल्या सीमाप्रश्नी योगदानावर पाणी तर फिरवत आहेतच; शिवाय बेळगावच्या मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. तेव्हा अमोल कोल्हे यांनी बेळगावकरांच्या भावनांचा नक्की विचार करावा.
Belgaum Varta Belgaum Varta