डॉल्बी लावून रंगोत्सव साजरा
बेळगाव : पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात लोटांगण कार्यक्रमासह शहरात ठिकठिकाणी डॉल्बीच्या तालावर रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तरूणांकडून यंदा पावडर कलर वापरण्यावर भर देण्यात आला होता. एक ठिकाणी कारंजाची व्यवस्था केल्यामुळे पाण्यात चिंब होवून गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत रंगांची उधळण करत युवक-युवतींनी रंगपंचमी खेळण्याला पसंती दिली.
बेळगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये धुलीवंदननंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. मात्र तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळगा (उ.), हिंडलगा, बेनकनहळळी गावांमध्ये होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदन दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते. त्या प्रथेनुसार आज सुळगा (उ.), हिंडलगा आणि बेनकनहळळी येथेही उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच गावातील गल्लोगल्ली रंगपंचमीसाठी बालचमूंची लगबग दिसून आली. पिचकारी, रंगाचे फुगे घेऊन सर्वजण एकत्र आले एकमेकांना रंग लावून सप्तरंगात न्हाऊन निघाले.
शहराप्रमाणे गावातही रंगपंचमीसाठी वॉटर शॉवर आणि डीजेला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.रंगोत्सवात तरुणाई सह ज्येष्ठ आणि वृद्धांचाही सहभाग लक्षवेधी ठरला.
देशभरात अश्वत्थामाची केवळ दोनच मंदिरे
बेळगाव शहर आणि परिसरात अनेक संस्कृती आणि परंपरा आहेत. यात पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिराला मोठी परंपरा असून, मंदिरात लोटांगण घालण्यासाठी हजारो नागरिक गर्दी करतात. या मंदिराची दिवसेंदिवस ख्याती वाढत आहे. देशभरात अश्वत्थामाची फक्त दोनच मंदिरे आहेत, त्यामुळे येथील पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात लोटांगण कार्यक्रमासह शहरात ठिकठिकाणी डॉल्बीच्या तालावर रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बेळगावच्या पांगुळ गल्लीत असणारे दक्षिण भारतातील अश्वत्थामा मंदिर एकमेव आहे. महाभारतात अनेक महान योद्धे होऊन गेले. यामध्ये अश्वत्थामा महान योद्धे होते. मात्र त्यांची देशात फक्त दोनच मंदिरे आहेत.