बेळगाव : राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी मतांसाठी तसेच वैयक्तिक स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. या अपमानाला सडेतोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने १९ मार्च रोजी राजहंसगडावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात मराठा मंदिरात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत समिती नेत्यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, राजहंसगड येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे राष्ट्रीय पक्षांनी दोनदा अनावरण केल्याने अवमान झालेल्या शिवमूर्तीचा राज्याभिषेक सोहळ्या प्रमाणे 19 मार्च रोजी शुध्दीकरण करण्यात यावे. दुग्धाभिषेक आणि पाद्यपूजन देखील करण्यात यावे.
त्याचबरोबर गेल्या ८ वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिवसृष्टीसंदर्भातही त्यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसृष्टीमध्ये कोंडून ठेवण्यात आलेल्या शिवरायांच्या मूर्तीचे देखील शुद्धीकरण करण्याचा इशारा त्यांनी दिला.
राजहंसगडावर १९ मार्च रोजी आयोजिलेल्या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी सहभागी व्हावे आणि हा सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा करावा, यासाठी जनजागृती करणे आवश्यक असून एकसंधपणे जनजागृतीकरून जनतेचा पाठिंबा मिळवूया, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta