येळ्ळूर ग्रामपंचायत ठरली बेळगाव तालुक्यातील पहिली ई बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणारी ग्रामपंचायत
बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 13 मार्च 2023 रोजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ई बँकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकीत ग्रामपंचायतीमधे ई-बँकिंग सेवा उपलब्ध करून नागरिकांना थेट सुविधा देण्याची ही क्रांतिकारी सुरुवात येळ्ळूर ग्रामपंचायतीमधे बेळगाव तालुका कार्यकारी अधिकारीराजेश धनवाडकर, सहाय्यक निर्देशक राजेंद्र मोरबद, युनियन बँक व्यवस्थापक किर्तिराज कदम तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी बेळगाव तालुका कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर म्हणाले की येळ्ळूर ग्रामपंचायत नवनवे आणि वेगवेगळे उपक्रम करण्यामध्ये नेहमीच सक्रिय असते आणि असेच प्रत्यंतर पुन्हा एकदा या ई-बँकिंग सुविधेच्या पाहायला मिळत आहे. बेळगाव तालुक्यामध्ये ई बँकिंग ही सुविधा ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून देणारी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. आणि हे कौतुकास्पद आहे असे उद्गार त्यांनी काढले तसेच पुढेही अशीच क्रांती या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घडो अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच यावेळी बोलताना युनियन बँक व्यवस्थापक किर्तिराज कदम म्हणाले की माझ्या निदर्शनात आतापर्यंत आलेली येळ्ळूर ग्रामपंचायत ही पहिली अशी ग्रामपंचायत आहे जिथे इ बँकिंग प्रणाली सुरू करण्यात आलीय आणि हे अगदीच उल्लेखनीय असू एकंदरीत यापुढे युनियन बँकेच्या माध्यमातून जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य आम्ही ग्रामपंचायतीला करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. आणि ई बँकिंग म्हणजे नेमकं काय याची सविस्तर माहिती देऊन ई बँकिंगचे महत्व त्यांनी यावेळी विशद केलं
सगळीकडे आता डिजिटल आणि कॅशलेस प्रणाली पहायला मिळत आहे. त्यामुळे हा ई- बँकिंगचा उपक्रम साहजिकच एक मोठा बदल घडवून आणणारा आहे यातून नागरिकांसाठी भरपूर गोष्टी सोयीस्कर होणार आहेत, जसे की नरेगामधील मजुरांच्या घामाचे वेतन हे ग्रामपंचायतीमधील ई-बँकिंगच्या खात्यावर मजुराच्या नावे जमा होईल. तसेच योजनांचा निधी, अनुदान थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करून ते थेट नागरिकांच्या खात्यावर वर्ग केले जाईल. अगदी पाणीपट्टी, घरपट्टी भरण्यापसून ते वेगवेगळ्या योजना आणि त्यांचे अनुदान या सर्वच गोष्टी अत्यंत सोयीस्कर, पारदर्शी आणि लवकरात लवकर या ई बँकिंग च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहेत अशी माहिती यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी दिली. तसेच ग्रामपंचायतीचे वसुली कर्मचारी यांच्याकडेही हा क्यूँआर कोड दिलेला असून येळ्ळूर आणि अवचारहट्टी गावातील सर्व नागरिकांनी या ई बँकिंग उपक्रमाचा उपयोग करून कॅशलेस व्यवहारास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी बेळगाव तालुका कार्यकारी अधिकारी राजेश धनवाडकर, सहाय्यक निर्देशक राजेंद्र मोरबद, युनियन बँक व्यवस्थापक किर्तिराज कदम तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य, शिवाजी नांदूरकर, प्रमोद पाटील, रमेश मेनसे, परशराम परीट, जोतिबा चौगुले, राकेश परीट, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, कल्लाप्पा मेलगे,राजू डोंन्यांनावर, प्रदीप सुतार, सुनील अरलीकट्टी, ग्राम पंचायत सदस्या, मनीषा घाडी, रूपा पुंण्यानावर, सुवर्णा बिजगरकर, वनिता परीट, रुक्मिणी नाईक, शांता काकतकर, रेणुका मेलगे, लक्ष्मी कणबरकर, शांता मासेकर, राजकुवर पावले, तसेच पिडिओ सदानंद मराठे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta