
बेळगाव : राजहंसगडावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरु करून राष्ट्रीय पक्षांनी शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शिवभक्तांनी शिवमूर्तीचे जलाभिषेक व दुग्धाभिषेक, विधिवत पूजन करून शुद्धीकरण केले. यावेळी म. ए. समितीशी एकनिष्ठ राहून आदेश पाळण्याची शपथ शिवरायांना स्मरून घेण्यात आली.

गेल्या 15-20 दिवसांपासून भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी राजहंसगडावर उभारलेल्या सर्वात उंच शिवमूर्तीवरून राजकारण सुरु केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ऐतिहासिक शिवपुतळा शुद्धीकरण कार्यक्रम घेण्यात आला. त्यासाठी गेल्या 15-20 दिवसांपासून समितीने जनजागृती केली होती. त्याला प्रतिसाद देत बेळगाव शहर, तालुका, खानापूर, निपाणीसह जिल्ह्यातून आलेल्या हजारो शिवभक्त कार्यकर्त्यांच्या उच्चांकी जनसागराच्या उपस्थितीत गडाजवळील सिद्धेश्वर मंदिरात पूजा करून पालखी मिरवणूक काढण्यात आली. झांजपथक, ढोल-ताशांच्या दणदणाटात उत्साहाने सळसळणाऱ्या हजारो युवकांनी मिरवणूक आणि शिवमूर्ती शुद्धीकरण सोहळ्यात जल्लोषाने सहभाग घेतला. यावेळी शिवमूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मार्कंडेय, मलप्रभा, घटप्रभा, कृष्णा आणि पंचगंगा या पंचनद्यांचे जल आणि सोहळ्यासाठी खास आणलेल्या गंगाजलापासून शिवमूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. सोहळ्यासाठी खास रायगडावरून पाचारण केलेल्या पुरोहितांनी धार्मिक विधींचे पौराहित्य केले. भगवे फेटे, टोप्या परिधान केलेले शिवभक्त आणि सर्वत्र डौलाने फडकणार भगवे ध्वज यामुळे चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते.

यासंदर्भात माहिती देताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की, भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी केवळ राजकीय फायद्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून त्यांचा अवमान केलाय. त्यामुळे स्वाभिमानी मराठी जनता संतप्त होऊन नेत्यांना विचारणा केली. हा पुतळा प्रशासनाच्या निधीतून म्हणजेच जनतेच्या पैशातून उभारला असल्याने आम्हालाही येथे पूजा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही हा शुद्धीकरण कार्यक्रम घेतला आहे. आधीप्रमाणे मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी संघटित होण्याची, राष्ट्रीय पक्षांच्या कसल्याही अमिषाला बळी न पडत महाराष्ट्र एकीकरण समितीचा आदेश तंतोतंत पाळण्याची शपथ येथे मराठी माणसाने शिवरायांना साक्षी ठेवून घेतली आहे. हा सर्व कार्यक्रम सीमालढ्यात नेहमी अग्रणी राहणाऱ्या येळ्ळूर गाववासीयांच्या पुढाकाराने पार पडला आहे. राजकीय पक्ष मराठी माणसाला वापरून फेकून देण्याचे तंत्र अवलंबत आहेत हे मराठी जनतेच्या लक्षात आले आहे. हा डाव हाणून पडण्याचा निश्चय मराठी माणसाने केला आहे असे किणेकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक-अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना झाली तेंव्हा राष्ट्रीय पक्ष मूग गिळून गप्प बसले होते. आता निवडणुकीच्या तोंडावर ते राजकीय फायद्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन त्यांचा अवमान करत आहेत. त्यामुळे आज शिवमूर्ती शुद्धीकरण सोहळा पार पाडला आहे. त्याला जिल्ह्यातून हजारो शिवभक्त, माताभगिनी उपस्थित आहेत. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन, हिंदुरक्षक म्हणवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नऊ वर्षे शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांना कोंडून ठेवून अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी 2 आणि 5 मार्च रोजी भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी राजहंसगडावर शिवमूर्तीचा अनावरण कार्यक्रम घेतला. तो शास्त्रोक्त नव्हता. यातून आपले दैवत शिवरायांचा झालेल्या अपमानाच्या निषेधार्थ आज शिवमूर्ती शुद्धीकरण सोहळा आयोजित केला आहे. त्याला मराठी जनतेने स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून उपस्थित राहून योगदान दिले आहे. या सोहळ्यानंतर महाप्रसादासाठी जनतेने पदरमोड करून शिवरायांवरील प्रेम, भक्ती दाखवून दिली आहे.
दरम्यान, शिवमूर्तीला जलाभिषेक, दुग्धाभिषेक घातल्यानंतर उपस्थित लोकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यासाठी विविध गावच्या लोकांनी यथाशक्ती मदत करून शिवप्रेमाचे दर्शन घडविले. कार्यक्रमास हजारो मराठी भाषिक शिवभक्त भगवे फेटे, भगव्या टोप्या घालून उपस्थित होते. गडावर ठिकठिकाणी भगवे झेंडे डौलाने फडकत होते. त्यामुळे राजहंस गडाने भगवे रूप धारण केल्याचे सुंदर दृश्य पहायला मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta