
जायंट्स मेनने केले हुतात्मा चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे नुतनीकरण
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे असून हुतात्मा चौकातील जीर्ण झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करून जायंट्स मेन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे मत उपमहापौर रेश्मा पाटील यांनी मांडले.
कावेरी कोल्ड्रिंक्सच्या पाठीमागील सार्वजनिक स्वच्छतागृह जीर्ण अवस्थेत होते त्यामुळे नागरिक इतरत्र मलमूत्र विसर्जन करीत असत यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती.
ही गरज ओळखून जायंट्स मेनचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांच्या पुढाकाराने याचे नूतनीकरण करण्यात आले व त्याठिकाणी पाण्याची टाकी बसवून स्वच्छता रहावी या उद्देशाने पाण्याचीसुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरुवातीला रेश्मा पाटील आणि नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांच्याहस्ते फीत सोडून हे स्वच्छतागृह नागरिकांना खुले करण्यात आले. त्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी बोलताना महानगरपालिकेकडुन योग्य ते सहाय्य करू असे सांगितले व या स्वच्छतागृहासाठी कायमस्वरूपी पाण्याचे कनेक्शन देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, समाजसेवक प्रविण पाटील, अभियंता सचिन कांबळे यांचीही समयोचित भाषणे झाली.
शेवटी शिवकुमार हिरेमठ यांनी आयुक्त रुद्रेश घाळी, सचिन कांबळे तसेच देणगीदारांमुळे हा प्रोजेक्ट पूर्णत्वास गेल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मप्रसाद हुली यांनी तर आभार सेक्रेटरी मुकुंद महागावकर यांनी मानले.
यावेळी मोठ्या संख्येने जायंट्स मेनचे पदाधिकारी, सदस्य, ट्रेडर्स असोसिएशनचे पदाधिकारी, अंध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta