बेळगाव : बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातून योग्य उमेदवार निवड करण्यासाठी निवड कमिटी स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघातील निवड कमिटी पारदर्शकरित्या निवड प्रक्रिया पूर्ण करेल, असे आश्वासन दोन्ही निवड कमिटीने महाराष्ट्र एकीकरण समितीला दिले आहे.
दोन्ही मतदारसंघात जनतेचा कौल घेऊनच उमेदवार देण्यात येणार आहे. शहर समितीने निवड कमिटीला तसे आदेश दिले आहेत.
उमेदवार निवडत असताना त्या उमेदवाराची पार्श्वभूमीवर तपासणे गरजेचे आहे. त्याचे सामाजिक कार्यातील योगदान तसेच इतर समाजाशी असलेले त्या उमेदवाराचे संबंध लक्षात घेतले पाहिजे. तो स्वबळावर इतर समाजाची कितपत मते घेऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून उमेदवार देणे गरजेचे आहे, असे समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, निवड कमिटीला उमेदवार निवड करण्यासाठी कार्यकर्त्यानी मतदारांनी व नेतेमंडळींनी सहकार्य करावे. राष्ट्रीय पक्षाला टक्कर देणारा तुल्यबळ उमेदवार समितीने देणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने सारासार विचार करून जनतेतून आलेला उमेदवार देणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेने देखील निवड कमिटीला सहकार्य करावे, असे देखील ते म्हणाले.
निवड कमिटीने निष्ठावंत कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन प्रत्येक विभागात जातिनिशी हजर राहून उमेदवार निवडण्याचे शहर समितीने दोन्ही समित्यांना दिले आहेत. त्यानुसार निवड कमिटी तुल्यबळ उमेदवाराची निवड करतील, असा विश्वास यावेळी मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta