बेळगाव : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत म. ए. समितीतर्फे खानापूरमधून मुरलीधर पाटील, बेळगाव ग्रामीणमधून आर. एम. चौगुले तर बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून सर्व संमतीने निवड झाली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व विजयासाठी शुभेच्छा.
गेल्या निवडणुकीत बेळगाव उत्तर मतदार संघ वगळता सर्वच मतदार संघांमध्ये बंडखोरी झाल्यामुळे म. ए. समितीला दारून पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण यंदा उलट स्थिती आहे. वरील तीन मतदार संघासह बेळगाव दक्षिण मतदार संघातही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारीवरून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी तर काही ठिकाणी पक्षांच्या उमेदवाराविरुद्ध काम केले जाण्याची शक्यता आहे याचा फायदा सर्वच म. ए. समितीच्या उमेदवारांना होण्याची दाट शक्यता आहे.
आता राहिला बेळगाव दक्षिण मतदार संघाचा प्रश्न. या मतदार संघात एका राष्ट्रीय पक्षाने विद्यमान आमदाराला उमेदवारी देऊन म. ए. समितीसमोर एक आव्हान निर्माण केले आहे. या आव्हानाला टक्कर देण्यासाठी तगडा उमेदवार देणे भाग आहे. वेळप्रसंगी साम, दाम, दंड याचा सुद्धा वापर करावा लागणार आहे आणि ती ताकद उमेदवारांच्या रिंगणात राहिलेल्या सहा उमेदवारांपैकी फक्त रमाकांत कोंडुस्कर यांच्यात आहे.
मतदार संघातून कोंडुस्कर यांना मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहता व एकंदर परिस्थिती पाहता रमाकांत कोंडुस्कर यांनाच उमेदवारी मिळणे रास्त आहे.
– शिवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार
Belgaum Varta Belgaum Varta