बेळगाव : सीमाभागात नेहमीच मराठी भाषिकांची गळचेपी होत असते. कर्नाटक सरकारला मराठी भाषेची काविळ आहे. त्यामुळे मराठी भाषिकावर कुरघोडी करत असते. कर्नाटक सरकारची समिती नेते व कार्यकर्त्यांवर करडी नजर असतेच मात्र राष्ट्रीय पक्षात असलेल्या मराठी भाषिकांना देखील सावत्रपणाची वागणूक देत असल्याची प्रचिती नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारी यादीतून दिसून येते.
बहुसंख्य मराठी भाषिक असलेल्या उत्तर मतदारसंघात भाजपचे खाते उघडत प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले अनिल बेनके यांना भाजपाने उमेदवारी नाकारली आहे. अनिल बेनके हे मराठा समाजाशी निगडित असून ते मराठी भाषिक आहेत. दक्षिण मतदारसंघातील सकल मराठा समाजाचे नेते व भाजप ओबीसी मोर्चा राज्य सचिव किरण जाधव हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक होते. दक्षिण मतदारसंघात 80 टक्क्यांहून अधिक मराठा समाज असून देखील भाजपने जैन समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल हे देखील काँग्रेसचे धडाडीचे नेते आहेत. दक्षिण मतदार संघात गोरल यांनी आपले चांगलेच वर्चस्व प्रस्थापित केले आहे तरी देखील काँग्रेसने त्यांचा विचार न करता कानडी भाषिक उमेदवार देण्याचे संकेत आहेत.
खानापूर तालुक्यात देखील भाजपने अरविंद पाटील यांना उमेदवारी डावलली आहे. अरविंद पाटील हे एकदा समितीतर्फे आमदारकी भूषवून सध्या ते भाजपवासीय झाले आहेत. खानापूर तालुक्यात त्यांचे स्वतःचे असे एक वेगळे अस्तित्व आहे. त्यांचा कार्यकर्त्यांचा ताफा मोठा आहे. ते भाजपमधून विधान सभेसाठी इच्छुक होते मात्र पक्षाने त्यांना देखील उमेदवारी नाकारली आहे. मराठा समाजावर प्रभुत्व असलेले हे चारही नेते राष्ट्रीय पक्षाने नाकारल्यामुळे दुखावले आहेत. यातील काही बंडाच्या पवित्र्यात आहेत. या नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समिती उमेदवाराला निवडून आणावे व मराठी अस्मिता दाखवून द्यावी, अशी मागणी मराठी भाषिकातून जोर धरत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta