





बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण मतदार संघातून रमाकांत कोंडुस्कर तसेच उत्तर मतदार संघातून ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी आज दुपारी भव्य मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र एकीकरण समितीला लागलेले दुहीचे ग्रहण संपल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे याची प्रचिती आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतून आलेली आहे.
दक्षिण मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत दादा कोंडुस्कर तसेच उत्तर मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आंबेडकर उद्यानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला अभिवादन करून या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. हजारो समितीनिष्ठ मराठी भाषिकांच्या उपस्थितीत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत भगवे ध्वज, भगव्या टोप्या आणि फेटे परिधान करून विजय उत्सवाच्या मिरवणुकीप्रमाणे आजची मिरवणूक अत्यंत जल्लोषात निघालेली होती. संपूर्ण परिसर भगवेमय झाले होते.
महानगरपालिकेत अर्ज दाखल केल्यानंतर भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोल ताशे, पारंपारिक वाद्य, बैलगाड्या, घोडेस्वार शिवरायांच्या वेशभूषेतील मराठमोळे मावळे तसेच महिला व युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरुवात झालेली मिरवणूक डीसी ऑफिस मार्गे आरटीओ सर्कलवरून महानगरपालिकेकडे या मिरवणुकीची सांगता झाली.

मिरवणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, अशा प्रकारच्या घोषणा देत आसमंत दणाणून टाकला होता. बैलगाडीतून बेळगाव दक्षिणचे अधिकृत उमेदवार रमाकांत दादा कोंडुसकर तसेच बेळगाव उत्तरचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातकांडे, आनंद आपटेकर, महादेव पाटील, विकास कलघटगी, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके यांच्यासह आजी-माजी महापौर नगरसेवक नगरसेविका, महिला वर्ग तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta