बेळगाव : विधानसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रासह महाराष्ट्रातील मंत्री आणि नेतेही भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटकचा दौरा करत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विजयपूर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी कर्नाटकात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येईल असा दावा केला.मात्र, या पत्रकार परिषदेत बेळगावचा सीमा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने देऊ केलेल्या शासकीय योजनांची अंमलबजावणी होत नाही. अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, बेळगावचा सीमा प्रश्न हा आजचा नसून, गेल्या कित्येक वर्षांचा आहे. सीमा प्रश्न हा निवडणुकीचा मुद्दा ठरू शकत नाही. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. यामुळे यावर बोलणे चुकीचे ठरेल. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि आमच्या पक्षाची ध्येयधोरणे वेगळी आहेत,असे सांगून फडणवीस यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.