Wednesday , December 10 2025
Breaking News

ढोंगी हिंदुत्व करणाऱ्या आमदाराला कायमच घरी बसायला लावणार : खा. संजय राऊत

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज बेळगावमध्ये दाखल झाले असून कारभार गल्ली, वडगाव येथे आज कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, संजय पवार, दक्षिण उमेदवार रमाकांत कोंडुसकर, म. ए. समिती सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तुफान गर्दीत कोपरा सभा पार पडली.

यावेळी जाहीर व्यासपीठावरून संजय राऊत यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर तोफ डागत येथील लोकप्रतिनिधींचे हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका केली. मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करू पाहणाऱ्या आमदारांनी आजवर निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. शेतकऱ्यांची शेती हिरावून घेणे, जडपशाहीने जमिनी बळकावणे, हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्या आमदारांनी मंदिरे देखील सोडली नाहीत. येत्या रविवारी योगी आदित्यनाथ देखील बेळगावमध्ये प्रचारासाठी येत असून त्यांना येथील पाडण्यात आलेली मंदिरे दाखवा असे जाहीर आवाहन संजय राऊत यांनी केले. अयोध्येत राम मंदिर उभं करून राजकारण सांगणारे भाजपाचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. शिवसेना नसती तर अयोध्येत राम मंदिर उभं राहील नसतं आणि बाबरीही पाडवली नसती. बाबरी पाडण्यात आली त्यावेळी पळून जाणारे भाजपावलेच होते, अशी टीकाही त्यांनी केली.

संजय राऊत यांचे सभेच्या ठिकाणी आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. घोषणाबाजी केली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी संजय राऊत यांनी हा जल्लोष आणि उत्साह विजय संकल्पाचा नसून विजयाच्या शुभारंभाचा असल्याचे सांगितले. विरोधी पक्षाने या भागात समितीची सभा होणार यासाठी आधीच अंधार केला होता. यावर टीका करत हेच भाजपचे हिंदुत्व असल्याचे सांगत स्थानिक आमदारांवर निशाणा साधला. कर्नाटकात भाजप विरोधात असलेल्या उमेदवारांच्या घरावर छापे पडत आहेत, मात्र आमच्याकडेही अनेकांची यादी असून सत्य आणि न्याय जर भाजप जपत असेल तर सुरुवात दक्षिणच्या विद्यमान आमदारांच्या घरापासून करावी, असे जाहीरपणे त्यांनी आव्हान दिले.

यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या बेळगाव दौऱ्याचादेखील समाचार घेतला. जो सीमाभाग गेली ६६ वर्षे महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करत आहे, बलिदान देतो आहे, रक्त सांडतो आहे, मराठी भाषा, संस्कृती, मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी लढतो आहे, तुरुंगात जातो आहे त्यांना पाठिंबा देण्याऐवजी बेळगावमध्ये येऊन मराठी माणसाविरोधात प्रचार करणाऱ्या नेत्यांना लाज वाटत नाही का? असा खडा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. अशा नेत्यांची महाराष्ट्राचे, शिवरायांचे नाव घेण्याची लायकी नसल्याचेही ते म्हणाले.

यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनीही मनोगत व्यक्त केले. दक्षिण मतदार संघातील उमेदवार आपल्या दलालांकडून मतदारांना मतांसाठी फोन करत असून दडपशाही करून जमिनी बळकावणाऱ्या, मंदिरांवर हातोडा मारणाऱ्या, शेतकऱ्यांची शेती हिरावून घेणाऱ्या आणि ढोंगी हिंदुत्वाचे राजकारण करून सर्वसामान्य नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी उभं राहू नका असे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी केले.

वडगाव येथील कोपरा सभेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेने परिसर दणाणून सोडला होता. फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात हि सभा पार पडली.

 

About Belgaum Varta

Check Also

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

Spread the love  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *