बेळगाव : माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याकरिता मी बेळगावला आलो आहे, संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली करणं सोडलं तर मी येथे येणार नाही असे सांगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात म. ए. समितीच्या विरोधात भाजपचा प्रचार केल्याचं समर्थन केलं.
बेळगाव उत्तरमधील भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी आज बेळगावातील टिळक चौकात जाहीर सभा घेतली. त्याला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याकरिता येथे आलो आहे, भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी बेळगावला आलो होतो. परंपरेचं म्हणाल तर विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे प्रभारी होते. त्यांनी संपूर्ण कर्नाटकात दौरा करून काँग्रेसचा प्रचार केला होता. त्यामुळे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याकरिता येथे आलो आहे असे फडणवीस यांनी सांगितले. मराठी भाषिकांच्या पाठीशी आपण नाही का? या प्रश्नावर, मराठी भाषिकांच्या पाठीशी मीसुद्धा आहे अन भारतीय जनता पक्षही आहे. म्हणूनच भाजप सरकारने येथे मराठा बोर्ड स्थापन केले आहे असे ते म्हणाले.संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली करणं बंद केलं तर मी येथे येणार नाही, आम्हाला सांगण्याआधी त्यांनी आपला मित्रपक्ष काँग्रेसला, येथे उमेदवार उभे करू नका, प्रचाराला पक्षनेते आणू नका असे सांगावे. पण ते सांगत नाहीत. कारण काँग्रेसच्या सांगण्यावरून आमची मते कमी करायला, काँग्रेसची दलाली करायला संजय राऊत येथे येतात असा आरोप फडणवीस यांनी केला.यावेळी बेळगाव भाजप महानगर अध्यक्ष आ. अनिल बेनके, सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta