बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची आज बेळगावात भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बेळगाव तालुक्यातील कावळेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना येत्या 11 तारखेला करण्यात येणार आहे. बेळगावातील अनगोळ येथील मूर्तिकार विक्रम पाटील यांनी हा भव्य पुतळा साकारला आहे. अनगोळ येथील त्यांच्या कार्यशाळेतून आज या पुतळ्याची बेळगावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. संभाजी महाराज चौकात आणल्यानंतर शिवपुतळ्याचे श्रद्धा-भक्तीने पूजन करण्यात आले. माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील आदींच्या हस्ते भव्य अश्वारूढ शिवपुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे म्हणाले की, कावळेवाडी येथील शिवभक्तांच्या निर्धारातून गावात शिवपुतळा उभारणीचे स्वप्न साकार होत आहे. विक्रम पाटील यांनी अतिशय सुंदर असा शिवरायांचा भव्य पुतळा साकारला आहे. येत्या ११ तारखेला याचे समारंभपूर्वक अनावरण करण्यात येणार आहे.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी माजी आमदार अनिल बेनके, भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील, डॉक्टर रवी पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवाजी सुंठकर, मनोहर मोरे, वाय पी नाईक, ऍड. नामदेव मोरे, विजय जाधव, रवळु मोरे, पी एस मोरे, पी आर गावडे आदींसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. पूजनानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा मिरवणुकीने शहरात फिरून गणेशपूर, बेनकनहळ्ळीमार्गे कावळेवाडीला नेण्यात आला. मिरवणुकीत शिवपुतळ्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.