बेळगाव : शहापूर भागातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी साकारलेल्या सजीव देखाव्याने शहापूर भागात अवघी शिवसृष्टी निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तसेच, मिरवणूक पाहण्यासाठी नाथ पै चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
प्रारंभी शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे नाथ पै चौक येथे चित्ररथ मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, नगरसेवक रवी साळुंके, पी जे घाडी, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहापूर भागातील विविध सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे चित्ररथ मार्गस्थ होऊ लागले.