बेळगाव : वडगाव- अनगोळ रोड येथील पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यात दुसऱ्यांदा गटार बांधकाम करून जनतेच्या पैशाची उधळण होत आहे. प्रशासनाने भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे.
पारिजात कॉलनी येथे सहा महिन्यापुर्वी गटारीचे बांधकाम करण्यात आले होते. पण गटारीच्या शेजारील जागेत स्थानिक लोकप्रतिनिधींचे लागेबांधे असल्यामुळे गटार दुसऱ्यांदा करण्यासाठी आरेखन करण्यात आले आहे. तसेच रस्त्यात दहा फूट अंतरावर गटार बांधकाम करण्यात येणार आहे. अधिकारी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली काम करत असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. लोकप्रतिनिधींच्या भ्रष्ट कामामुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास तो कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा रमाकांत कोंडुस्कर यांनी दिला.

शहरात तसेच उपनगरात अनेक ठिकाणी रस्ते करणे आवश्यक आहे पण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक रस्ते केले जात नाहीत तर काही ठिकाणी दोन दोन वेळा रस्ते करून भ्रष्टाचार करण्यात येत आहे. या कामाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतेही काम करण्यात येऊ नये अशी मागणी महानगरपालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्याचबरोबर अनगोळ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अर्धवट सोडून दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने संभाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. चौथरा व इतर सुशोभीकरण काम अर्धवट असताना प्रतिष्ठापना करून पुतळा झाकून ठेवला आहे. हा आमच्या राष्ट्रपुरुषांचा अवमान आहे त्यामुळे अर्धवट राहिलेले काम तात्काळ पूर्ण करा, अशी मागणी रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta