बेळगाव : रायबाग तहसीलदार कार्यालयातील कंत्राटी कामगाराने वकिलाच्या छळाला कंटाळून फेसबुकवर लाईव्ह येत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
हालप्पा सुराणी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून वकिलाच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ते पाहून त्याच्या पत्नीने देखील विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. उभयतांना तात्काळ हारुगिरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
हलाप्पा सुराणी हे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात जमीन नोंदणी विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. रायबाग येथील वकील सदाशिव निडोनी व हलाप्पा सुराणी यांच्यात जमिनीच्या नोंदणीवरून वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर वकील सदाशिव यांनी हलाप्पा यांच्या विरोधात खटला दाखल केल्याचे समजते. त्यामुळे रात्री उशिरा फेसबुकवर लाईव्ह येत सदाशिव यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून 2018 पासून ते आपला छळ करत आहेत, कार्यालयात येऊन शिवीगाळ करत आहे असा आरोप हलाप्पा यांनी करत विष प्राशन केले. ते पाहून त्यांच्या पत्नीने देखील विष प्राशन केले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Belgaum Varta Belgaum Varta