बेळगाव : पांगुळ गल्ली येथे जवळपास तीन दिवसापासून रस्त्याशेजारी झोपून असलेल्या एका असहाय्य वृद्ध भिक्षुक महिलेच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.
याबाबतची संक्षिप्त माहिती अशी की, पांगुळ गल्ली येथील एका दुकानदाराचा स्वस्तिक फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना फोन आला. त्या दुकानदाराने गल्लीत एक वृद्ध महिला रस्त्या शेजारी असहाय्य अवस्थेत पडून असल्याचे सांगितले. तेंव्हा स्वस्तिक फाउंडेशनचे कार्यकर्ते सागर बोरगल, सामाजिक कार्यकर्ते ॲलन मोरे, नारु निलजकर, अवधूत तुडवेकर, सॅम्युअल रॉड्रिग्ज व अमिष देसाई यांनी त्वरेने रुग्णवाहिकेसह पांगुळ गल्लीत जाऊन त्या वृद्ध भिक्षुक महिलेची विचारपूस केली. तसेच ती अशक्त झाली असल्यामुळे तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. या कामी त्यांना कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर टी., पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नावर आणि मार्केट पोलिसांचे सहकार्य लाभले.