मध्यवर्ती महामंडळाची मागणी; पालकमंत्री जारकीहोळींना निवेदन
बेळगाव : हेस्कॉमने वीजदरात मोठी वाढ केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे मंडळांना वीज बिलात सवलत देण्यात यावी. तसेच गणेशोत्सवाबाबत लवकर बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले.
मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी, साउंड सिस्टिम असोसिएशनचे पदाधिकारी, मूर्तिकार मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी आदींनी पालकमंत्री जारकीहोळी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी, बेळगाव शहरातील शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. येथील गणेशोत्सव मंडळे लोकवर्गणीतून उत्सव साजरा करत असतात. मात्र, हेस्कॉमने वीजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने लोकवर्गणीतून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मोठा त्रास होणार आहे. त्यामुळे सरकारने गणेशोत्सव मंडळांना वीजबिलात अधिक सवलत देणे गरजेचे आहे. मंडळाच्या मंडपात वीजपुरवठा करण्यासाठी आगाऊ रक्कम भरुन घेतली जाते. मात्र, ही रक्कम देण्यासही टाळाटाळ केली जाते. मूर्तिकार आणि साउंड सिस्टिम लावण्याबाबत असलेल्या समस्या दूर कराव्यात. गणेशोत्सव जवळ आल्यानंतर बैठक बोलावून निर्णय घेण्याऐवजी महामंडळाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची लवकर बैठक बोलावून विविध विषयांवर सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी केली.
मूर्तिकार संघटना व साउंड सिस्टिम असोसिएशनतर्फेही विविध समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. पालकमंत्री जारकीहोळी यांनी येत्या आठवड्याभरात मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी मंडळाचे रणजित चव्हाण पाटील, विकास कलघटगी, सागर पाटील, आनंद आपटेकर, मूर्तिकार संघटनेचे विनायक पाटील, साउंड सिस्टिम असोसिएशनचे शाम गौंडाडकर, साई कणेरी, बाळू जोशी, आनंद पाटील, सनी दरवंदर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta