बेळगाव : रस्त्यावर सापडलेल्या कासवाला जीवदान देताना सामाजिक कार्यकर्ते व ग्रा. पं. सदस्यांनी त्याला सुखरूपपणे गावच्या तलावात सोडल्याची घटना आज गुरुवारी सकाळी कंग्राळी बुद्रुक येथे घडली.
याबाबतची संक्षिप्त माहिती अशी की, कंग्राळी बुद्रुक येथे आज सकाळी वेशीच्या वस्तीकडे जाणाऱ्या ग्रा. पं. सदस्य सुरेश राठोड यांच्या गाडीसमोर एक कासव आले. सहसा पाण्यात राहणाऱ्या या जलचर प्राण्याला खुलेआम रस्त्यावर पाहून आश्चर्यचकित झालेल्या राठोड यांनी त्या कासवाला उचलून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्यांनी आपले सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते व ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या उभयतांनी त्या कासवाला जीवदान देताना त्याला गावच्या तलावामध्ये सोडले. यावेळी कुतूहलापोटी कासव पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.
जाणकारांच्या मते तलावात सोडण्यात आलेले कासव अंदाजे 5 ते 6 वर्षे वयाचे आहे. याप्रसंगी बोलताना यल्लोजीराव पाटील यांनी तलावात सोडलेला कासव कशाप्रकारे रस्त्यावर सापडला होता. याची थोडक्यात माहिती देऊन प्रत्येक प्राणी हा निसर्गाचा अविभाज्य अंग असल्यामुळे एखादा मुकप्राणी असहाय्य अवस्थेत आढळल्यास आपण त्याला सहाय्य करून जीवदान दिले पाहिजे, असे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta